• Mon. Nov 25th, 2024
    अनेकांना धक्का बसला असेल! LIVE सुरू असताना मॉरिस तीनदा उठला अन् घोसाळकरांवर जीवघेणा गोळीबार

    मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई असं आरोपीचं नाव आहे. घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

    उल्हासनगरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या शहर प्रमुखावर केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईतील दहिसरमध्ये गोळीबाराचा थरार घडला. शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक आणि मॉरिस यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद होते. मॉरिसला एका गुन्ह्यात तुरुंगवास घडला होता. यामागे अभिषेक यांचा हात असल्याचा संशय त्याला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यानं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. पैसे आणि मालमत्तांचे व्यवहार यावरुनही दोघांमध्ये वाद असल्याचं सांगितलं जातं. याच वादातून मॉरिसनं घोसाळकर यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
    Abhishek Ghosalkar Murder: अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या, वैमनस्यातून टोकाचे पाऊल?
    तुरुंगवास संपवून बाहेर आलेल्या मॉरिसनं अभिषेक यांच्याशी जवळीक साधली. त्यांचा विश्वास संपादन केला. गुरुवारी त्यानं कार्यालयाबाहेर साडी वितरणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी त्यानं घोसाळकरांना बोलावलं होतं. घोसाळकर कार्यक्रमस्थळी पोहोचताच मॉरिसनं त्यांची गळाभेट घेतली. आपापसातले वाद मिटवून दोघे एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आपण एकत्र आल्याची माहिती नागरिकांना समजावी यासाठी मॉरिसनं फेसबुक लाईव्हसाठी अभिषेक घोसाळकरांना कार्यालयात नेलं.

    आज आम्ही दोघांना एकत्र पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल, असं अभिषेक घोसाळकर म्हणाले. आमच्यात बरेच गैरसमज झाले होते. आता आयसी कॉलनीच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. गरीब आणि गरजूंसाठी आम्हाला काम करायचं आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. पुढे आणखी चांगली कामं करायची आहेत, असं म्हणत अभिषेक उठून उभे राहिले. अभिषेक बोलत असताना त्यांच्या शेजारी बसलेला मॉरिस उठून गेला होता. अभिषेक फेसबुक लाईव्हवरील बोलणं संपताच मॉरिस तिथे आला आणि त्यानं पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. यावेळी फेसबुक लाईव्ह सुरुच होतं.

    फोटोशूट, साड्या वाटप, फेसबुक लाईव्ह, हत्या अन् आत्महत्या
    मॉरिसनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर सपत्नीक पोहोचले होते. चिमुकल्यांसोबत त्यांना फोटोशूट केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते नागरिकांना साड्या, फळांचं वाटप करण्यात आलं. यानंतर मॉरिसनं त्यांना विश्वासात घेत कार्यालयात फेसबुक लाईव्हसाठी नेलं. अवघ्या ४ मिनिटांच्या लाईव्हमधून अभिषेक आणि मॉरिस यांनी संवाद साधला. वाद विसरुन आपण एकत्र येत असल्याचं सांगितलं. लाईव्ह सुरू असताना मॉरिस दोन ते तीन वेळा उठून बाजूला गेला. ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांना आहे.

    अभिषेक घोसाळकर नेमके कोण?
    अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी दहिसर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. अभिषेक घोसाळकर मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार होते. २०१२ मध्ये ते निवडून आले. २०१७ मध्ये हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला. त्यावेळी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed