• Tue. Nov 26th, 2024

    राज्यात पाच हजार रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री उदय सामंत

    ByMH LIVE NEWS

    Feb 8, 2024
    राज्यात पाच हजार रोजगार उपलब्ध होणार-उद्योगमंत्री उदय सामंत

    पुणे, दि.८: उद्योजकांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखविला असून आज  सुमारे ४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून सुमारे ५ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

    वाकड येथील हॉटेल टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योगविकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबु, उद्योग सह संचालक शैलेश रजपूत आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने होत आहे. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा येथे असून नवीन उद्योगांसाठी चांगली संधी आहे.  पुण्याची क्षमता राज्यासह देशाला कळावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे अशाप्रकारचा ‘उद्योजकांचा मेळा’ प्रत्येक जिल्ह्यात भरविण्यात येईल, यामुळे त्या जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण तयार होईल, विविध उद्योजक आकर्षित होऊन तेथील उद्योगामध्ये वाढ होईल, असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

    अल्ट्रामेगा प्रकल्पासोबत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे.  उद्योजक उद्योग करीत असताना त्यांसाठी निर्यात ही महत्वाची असून हीच बाब विचारात घेऊन ‘निर्यात धोरण २०२३’ जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून उद्योजकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर निर्माण होत असून आगामी काळात जगातील डेटा सेंटरचे हब म्हणून महाराष्ट्र राज्य ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आगामी काळात देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण आणण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पार्क निर्माण करतांना संरक्षण, आरोग्य, क्रीडा, कृषी आदी क्षेत्राचा विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेसोबत इलेक्ट्रिकल वाहन, हायड्रोजन या क्षेत्राच्या विकासाबाबतही प्रयत्न करण्यात येत आहे, असेही मंत्री श्री.सामंत म्हणाले.

    उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, यासाठी उद्योजकांशी सतत चर्चा करण्यात येत आहे. शासनाच्यावतीने त्यांना उद्योगपुरक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात परकीय गुंतवणूक वाढत असून उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात १ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु असून येत्या काळात गडचिरोली उद्योगनगरी म्हणून ओळखली जाईल, असेही उद्योगमंत्री म्हणाले.

    पुरस्कारार्थीचे अभिनंदन करून ते म्हणाले की, पुरस्काराला अन्ययसाधारण महत्व असून पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्था यांचा आदर्श घेऊन राज्यातील इतरांनी उद्योग उभारले पाहिजे, त्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हा पुरस्कार देण्यामागचा हेतू असतो. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी उद्योजकांची समिती गठीत करण्याची सूचना केली. पुरस्काराचे प्रस्ताव समितीकडे देण्यात यावे, प्रस्तावाच्या अनुषंगाने समितीच्या प्राप्त सूचना विचारात घेऊन आगामी काळात पुरस्काराचे वितरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितल.

    श्री. कांबळे म्हणाले की, राज्यात परकीय गुंतवणूक, उद्योगामध्ये वाढ व्हावी, याकरीता उद्योग विभागाच्यावतीने काम करण्यात येत आहे. उद्योग सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवान्यासाठी ‘मैत्री’ संकेतस्थळ सुरु करण्यात आले असून आवश्यक त्या सर्व परवानग्या विहित मुदतीत देण्यात येत आहे. राज्यात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने सूचना असल्यास उद्योग विभागाला कळवावे, असे आवाहन श्री. कांबळे यांनी केले.

    श्री. कुशवाह यांनी प्रास्ताविक केले. राज्यात माहिती तंत्रज्ञान धोरण आणि निर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा निहाय निर्यात समिती गठीत करुन जिल्हा निर्यात आराखडा तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादन निर्यात करण्यावर भर देण्यात येत आहे. दहा कलमी कार्यक्रम आखून जिल्हानिहाय निर्यातक्षम उपक्रम निश्चित करण्यात आले आहे, असेही श्री. कुशवाह म्हणाले.

    श्री. शर्मा यांनी राज्याची उद्योग क्षेत्रातील कामगिरीबाबत पीपीटीद्वारे माहिती दिली.

    श्री. सामंत यांच्या हस्ते ‘एक्सपोर्ट पॉलिसी २०२३’ या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच निर्यातभिमुख उत्पादनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दालनाला भेट देऊन उत्पादनाची माहिती घेतली.

    उद्योग मंत्री उदय सामंत यांची महाटेक-२०२४ प्रदर्शनाला भेट

    उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित  ‘महाटेक २०२४’ या लघु व मध्यम उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट देवून माहिती घेतली. यावेळी लघु व मध्यम उद्योजकांच्या विकासासाठी शासन प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी महाटेकचे संचालक विनय मराठे, सुमुख मराठे,  प्रकल्प संचालक संतोष नांदगावकर, महाव्यवस्थापक सुधाकर थत्ते, पुणे प्रकल्प संचालक महेन्द्र घारे आदी उपस्थित होते.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed