• Mon. Nov 25th, 2024
    ४८ वर्षांनी काँग्रेसची साथ सोडणारे बाबा सिद्दीकी कोण?

    मुंबई: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी स्वत: एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सिद्दीकी हे काँग्रेसला रामराम करणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होती. आज अखेर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली. बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात प्रवेश घेणार असल्याची चर्चा आहे. बाबा सिद्दीकी हे गेल्या ४८ वर्षांपासून काँग्रेसमध्ये होते, त्यामुळे त्यांचा राजीनामा हा राज्यातील काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

    बाबा सिद्दीकी आणि त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांनी गेल्या गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पुढील रणनितीवर चर्चा केली होती. त्यानंतर आज बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा दिला. झिशान सिद्दीकीही राजीनामा देणार की ते काँग्रेससोबतच राहणार आता हे पाहावं लागणार आहे.

    अजित पवार गटाला काय फायदा?

    बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटात प्रवेश होणे हे यासाठीही महत्त्वाचं मानलं जात आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडे आल्यानंतर आता त्यांना राज्यात एका मुस्लिम चेहऱ्याची गरज आहे. कारण, नबाव मलिक हे शरद पवार गटात आहेत.

    कोण आहेत बाबा सिद्दीकी?

    बाबा सिद्दीकी हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तीन वेळा आमदार झाले आहेत. ते अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष होते. त्यांनी राजकारणाची सुरुवात ही विद्यार्थी नेता म्हणून केली आणि प्रथमच ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पराभव केला होता.

    २०१७ पासून तपास यंत्रणांच्या रडारवर

    बाबा सिद्दीकी हे २०१७ पासून तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मे २०१७ मध्ये इडीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) घोटाळ्याप्रकरणी सिद्दीकी आणि इतर काही जणांच्या ठिकाणांचा तपास घेतला होता. तसेच, २०१८ मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात इडीने त्यांच्या ४६२ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली होती.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed