पालिकेच्या विभाग पातळीवर तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त (पर्यावरण) मिनेश पिंपळे यांनी दिली. लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मवरही हे ॲप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ॲपमध्ये मागील सहा महिन्यांमधील सर्व तक्रारी पाहता येतील.
एखादी नवीन तक्रार दाखल करताना तक्रारीचे स्वरूप, तक्रारीचा तपशील, आपले ठिकाण (लोकेशन), रस्त्याचे नाव, विभागाचे नाव, तक्रारीशी संबंधित छायाचित्र आदी बाबींचा तपशील प्रत्येक नवीन तक्रारीसोबत भरावा लागणार आहे. प्रत्येक तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा तपशीलही ॲपवर पाहता येईल. तक्रार दाखल करतेवेळी वापरकर्त्याला स्वतःचा पत्ता स्वयंचलित (ऑटो फेच) पद्धतीने किंवा स्वतः (मॅन्युअली) दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध राहील.
डॅशबोर्डवर मागोवा
तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी विविध टप्प्यांवर पडताळणीचा पर्याय देण्यात आला आहे. उपायुक्त, विभागीय पातळीवर सहायक आयुक्त तसेच आरोग्य अधिकारी या पातळीवर डॅशबोर्डच्या माध्यमातून तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. प्रत्येक तक्रारीचा ऑनलाइन वेब पोर्टलच्या माध्यमातून डॅशबोर्डवर मागोवा घेता येईल. तसेच तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रारींचे वर्गीकरणही डॅशबोर्डवर पाहता येईल.