चोरीचा हा प्रकार पाहून मध्य रेल्वेची झोप तेव्हा उडाली जेव्हा एक महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या एसी टॉयलेटमधून तब्बल दीड लाख रुपयांचे सामान चोरीला गेले. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार यात सहभागी असलेल्या अन्य लोकांचा शोध सुरू आहे. या घटनेची नोंद सीएसएमटी जीआरपीमध्ये नोंदवण्यात आली आहे.
CSMT रेल्वे स्थानकावरील उपनगरीय रेल्वे वाहतूकीच्या परिसरात एका महिन्यापूर्वी मध्य रेल्वेकडून आधुनिक टॉयलेट तयार करण्यात आले. या टॉयलेटमध्ये दुर्गंधी येऊ नये म्हणू्न आधुनिक मशिनचा वापर करण्यात आला आहे. चोरीच्या घटनेनंतर हे टॉयलेट सध्या बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. संबंधित टॉयलेट प्रवाशांसाठी दिवसरात्र खुले ठेवण्यात आले होते आणि त्याचाच फायदा चोरांनी घेतला. टॉयलेटच्या आत सीसीटीव्ही लावता येत नाही. पण अशा प्रकारे चोरी होत असताना जर कोणी पाहिले असेल तर ते यासंदर्भात माहिती देऊ शकतात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी हे टॉयलेट तयार झाल्यानंतर त्याची पाहणी केली होती. CSMT स्थानकावर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने त्याचा वापर सर्वाधिक केला जातो. यादव यांनी या टॉयलटेच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले होते.