• Sat. Sep 21st, 2024
मृतदेह जतनासाठी प्रभावी तंत्रज्ञान

[email protected]

मुंबई :

वैद्यकीय रुग्णालयांत प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना मृत मानवी शरीराद्वारे (कॅडेव्हर) शरीररचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता यावी म्हणून मृतदेह विशिष्ट प्रकारे जतन करणे आवश्यक असते. तो करण्याबरोबरच विविध वैद्यकीय शस्त्रक्रियांच्या कार्यशाळांमध्ये डॉक्टरांना प्रत्यक्ष कार्यानुभव घेणे अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी मृतदेहांवर विशिष्ट अशा ‘सॉफ्ट इम्बालबिंग’ या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डेरवण येथील एसव्हीजेसीटी संचालित वालावलकर रूरल मेडिकल कॉलेजच्या डॉ. प्रशांत मुल्या यांनी याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

देहदान केलेल्या व्यक्तीचा मृतदेह जतन करण्यासाठी त्यावर फॉर्मलिन या रसायनाच्या साह्याने विशिष्ट प्रक्रिया केली जाते. त्यामुळे मृत्यूनंतर मानवी शरीराला येणारा कडकपणा मृतदेहाला आलेला असतो. त्यामुळे शरीररचनेशी संबंधित काही गोष्टींचा अनुभव घेण्यावर मर्यादा येतात. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट (एसव्हीजेसीटी) संचालित भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रूरल मेडिकल कॉलेज, रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या शरीररचनाशास्त्र (अॅनाटॉमी) विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रशांत मुल्या यांनी यासाठी कॅडेव्हरवर ‘सॉफ्ट इम्बालबिंग’ या तंत्राचा वापर केला.

वालावलकर रुग्णालयात आयोजित डॉ. सतीशचंद्र गोरे (एण्डोस्कोपी स्पाइन सर्जन) यांच्या ‘एण्डोस्कोपी स्पाइन सर्जरी’ची कार्यशाळा आणि इंग्लंडहून आलेल्या डॉक्टरांच्या ‘रिजनल अॅनेस्थेशिया ब्लॉक्स’ या कार्यशाळांतील प्रात्यक्षिकांसाठी याच प्रकारच्या कॅडेव्हरचा वापर झाला. डॉ. गोरे, डॉ. लुईस नेलं, डॉ. संजय देशपांडे (भूलतज्ज्ञ इंग्लंड), डॉ. लान्स कोप, डॉ. सारंग पुराणिक या नामवंत डॉक्टरांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले. देशातील काही ‘एम्स’ रुग्णालयांत, तसेच महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले जाते. डॉ. मुल्या यांचा संस्थेच्या वतीने डॉ. लान्स यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र, रोख मानधन देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या संशोधनात विभागप्रमुख डॉ. पुष्पा बुरुटे, रुग्णालयाचे कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे डॉ. मुल्या यांनी सांगितले.

फायदा काय?

फॉर्मलिनचा वापर करून केलेल्या इम्बाल्बिंग प्रक्रियेमुळे मृतदेह जतन होत असला, तरी त्याला कडकपणा येतो. माणूस जिवंत असताना त्याची त्वचा जशी असते, सांध्यांची हालचाल ज्या प्रकारे होते, तसे अर्थातच ते नंतर राहू शकत नाही. त्यामुळे शस्त्रक्रियेचा सराव करताना प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना तो अनुभव मिळू शकत नाही. ‘सॉफ्ट इम्बालबिंग’ हे तंत्रज्ञान वापरून मृतदेह मानवी शरीराप्रमाणे मऊ राखला जातो. तसेच तो सात-आठ महिने टिकू शकतो. त्यामुळे शल्यचिकित्सकांना अधिक चांगल्या प्रकारे सराव करता येतो.

दोन वर्षांपासून मी या संशोधनावर काम करीत होतो. मुख्यत: डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लॅप्रोस्कोपिक, पाठीचा कणा, एण्डोस्कोपिक शस्त्रक्रियांचे तंत्र अवगत करताना हे संशोधन मोलाचे ठरणार आहे. यामुळे रुग्णांनाही दिलासा मिळू शकेल. – डॉ. प्रशांत मुल्या, प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed