• Mon. Nov 25th, 2024

    विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

    ByMH LIVE NEWS

    Feb 4, 2024
    विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

    पुणे, दि. ४ :  रोजगार मिळविण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी कौशल्याला महत्त्व असून विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावे, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

    आंबेगाव तालुका विद्या विकास संचलित बी.डी काळे महाविद्यालय, घोडेगाव येथील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, गट विकास आधिकारी प्रमिला वाळुंज, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष शाम होनराव,जयसिंगराव काळे, चेअरमन अँड मुकुंद काळे, कॉलेजचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्हेकर, कवी प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

    श्री.वळसे पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वतःमधील गुणांचा शोध घेऊन आपल्या करिअरची दिशा निश्चित करावी. आपल्यातील सुप्त कौशल्य अगोदरच ओळखणे गरजेचे आहे. आज विविध क्षेत्रात कौशल्याला महत्व प्राप्त झाल्याने. पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण अंगीकारणे आवश्यक आहे.

    पालकांनी मुलांना कोणते शिक्षण घ्यावे याची सक्ती करु नये. विद्यार्थ्यांची आवड आणि त्यांचे कौशल्य विचारात घेऊन त्यांना करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. याबाबत विद्यार्थ्यांचे शाळेत आणि घरी समुपदेशन करावे. विद्यार्थांना सक्ती न करता  त्यांना आवडीचे क्षेत्र निवडण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

    महाविद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक करून श्री. वळसे पाटील म्हणाले, आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ या संस्थेची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहाय्यभूत  ठरत आहे. महाविद्यालयांने चांगल्या वक्त्यांना निमंत्रित करावे. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विविध विषयांचे मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले.  महाविद्यालयातील वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

    आयुक्त श्री. काळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या कविता सादर करीत विद्यार्थीना मार्गदर्शन केले.

    यावेळी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना  पारितोषिके प्रदान  करण्यात आली.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *