जळगाव, दि. २ (जिमाका): शंखनाद, टाळमृदंग अन् ढोलताशांच्या गजरात ग्रंथांचे पूजन करून ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरुवात झाली.
ग्रंथदिंडीस महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, माजी आमदार स्मिता वाघ, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मराठी साहित्य महामंडळ व मराठी वाङ्मय मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री संत सद्गुरू सखाराम महाराज विठ्ठल संस्थान (वाडी संस्थान) येथून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या पालखीत दासबोध, श्री ज्ञानेश्वरी, भारताचे संविधान, श्रीमद् भगवतगीता, भारतीय संस्कृती या ग्रंथ गुरूंचा समावेश होता.
सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाची सुरवात होणार असल्याने अमळनेर शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी याच्यासह सुमारे ४ हजार सारस्वतांच्या गर्दीने अमळनेर शहर फुलले होते. दिंडी जसजशी पुढे -पुढे जात होती तसतसा अमळनेरकरांकडून दिंडीवर पुष्पवर्षाव होत होता. यामुळे मराठी सारस्वतांचा उत्साह अधिकच द्विगुनीत होत होता.
ग्रंथदिंडी सराफ बाजार, दगडी दरवाजा, राणी लक्ष्मीबाई चौक, सुभाष चौक, स्टेट बॅंक, पोस्ट ऑफिस, नाट्यगृह, उड्डाणपूल या मार्गाने येत असताना चौकात विविध ठिकाणी रांगोळी काढून ग्रंथांसह सारस्वतांचे स्वागत केले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली दिंडी संमेलनस्थळी १० वाजता पोहचली. मंत्री गिरीष महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशव स्मृती सेवा संस्था समूहाचे अध्यक्ष डॉ. भरत अमळकर यांनीही या दिंडीत सहभाग घेत पायी चालले, तर मंत्री श्री. महाजन यांनी दिंडी मार्गावरील विविध थोर महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
या संस्थाचा होता सहभाग
केशव शंखनाद पथक, पुणे, खान्देश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालय, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्रचार्य, सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, एनएसएस, एनसीसी, वसतीगृह विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ढोल ताशा पथक, गंगाराम सखाराम शाळा अमळनेर, द्रो. रा. कन्या शाळा, अमळनेर, प्रताप हायस्कूल, अमळनेर, मंगळग्रह संस्थान ग्रंथ पालखी, स्वामी विवेकानंद शाळा, बंजारा समाज पारंपरिक नृत्य चाळीसगाव, धनगर समाज पारंपारिक नृत्य, वासुदेव पथक जामनेर, नवलभाऊ प्रतिष्ठान आर्मी स्कूल, सावित्रीबाई फुले शाळा अमळनेर, साने गुरूजी शाळा, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, मराठी वाङ्मय मंडळाचे सर्व समिती सदस्य, वारकरी पाठशाळा अमळनेर, नंदगाव माध्यमिक विद्यालय, भरवस माध्यमिक विद्यालय, महसुल व पोलीस प्रशासन, फार्मसी महाविद्यालय, एसएनडीटी कॉलेज, एमएसडब्लू कॉलेज, टाकरखेडा माध्यमिक हायस्कूल, उदय माध्यमिक विद्यालय, चौबारी माध्यमिक विद्यालय, रणाईचा माध्यमिक आश्रमशाळा, हातेड माध्यमिक शाळा, कोळपिंप्री माध्यमिक विद्यालय, शारदा माध्यमिक शाळा कळमसरे, पी. एन. मुंदडा माध्यमिक शाळा, इंदिरा गांधी माध्यमिक शाळा, गडखांब माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.
०००