• Sat. Sep 21st, 2024

सुरक्षित माता अन् बालकांच्या आरोग्यासाठी पाऊल, काय आहे ‘वात्सल्य’ उपक्रम? आरोग्यसेवा कशा असतील?

सुरक्षित माता अन् बालकांच्या आरोग्यासाठी पाऊल, काय आहे ‘वात्सल्य’ उपक्रम? आरोग्यसेवा कशा असतील?

सुरक्षित माता व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग अनेक उपक्रम राबवतो. नवजात मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूतीदरम्यान आणि नंतर माता व बालसंगोपनाच्या विविध कार्यक्रमाचे एकत्रीकरण करून ‘वात्सल्य’ हा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर एप्रिल २०१८ पासून राबवण्यात आला. त्याचा वैद्यकीय प्रतिसाद लक्षात घेऊन आता तो राज्यभर राबविला जाणार आहे.

काय आहे ‘वात्सल्य’ उपक्रम?

राज्यात अनेक वर्षांपासून वाढते कुपोषण, बालमृत्यू, अपुऱ्या वयातील प्रसूती, मातेचे व बाळाचे अपुरे वजन, त्यामुळे होणारी गुंतागुंत अशा अनेक समस्या आहेत. गरोदरपणात तसेच बाळ झाल्यानंतर माता व दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या आरोग्याच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठीही या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. आरोग्य विभागाने बाळाची गर्भात असताना काळजी घेणे, गर्भवती आईला वैद्यकीय मार्गदर्शन आणि दिलासा देणे, यासाठी वात्सल्य उपक्रमाची सुरुवात केली. गर्भारपणाच्या विविध टप्प्यांमध्ये आईला मदत, वैद्यकीय मार्गदर्शन तसेच बाळाच्या जन्मानंतर पहिल्या हजार दिवसांपर्यंतच्या वाढीचे मूल्यमापन करणे तसेच वैद्यकीय सेवा देणे, आदी उपक्रम या माध्यमातून होणार आहेत.

उद्दिष्टे नेमकी काय आहेत?

कमी दिवसांच्या व कमी वजनांच्या बाळांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे, जन्मजात व्यंगाचे प्रमाण कमी करणे, गर्भधारणेपूर्वीच आरोग्याला असणारा धोका ओळखणे, त्वरित वैद्यकीय मदत व सुविधा पुरवणे आणि उपजत मृत्यूंचे प्रमाण कमी करणे ही उद्दिष्टे आहेत.

आरोग्यसेवा कशा असतील?

आई व बाळाच्या वजनवृद्धीवर लक्ष ठेवणे, जन्म झाल्यावर बाळाला तात्काळ स्तनपान देणे, स्तनपान तसेच पूरक आहाराचे मार्गदर्शन, सर्वच आरोग्य कार्यक्रमांचा समन्वय, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, आदिवासी विकास व इतर विभागांचा समन्वय आणि प्रजननक्षम वयातील जोडप्यांचे मार्गदर्शन या सेवा देण्यात येतील.

समाविष्ट उपक्रम कोणते?

गर्भधारणापूर्व रक्तक्षय प्रतिबंध व रक्तक्षय उपचार, रक्तक्षय असलेल्या मातांवर लोहयुक्त गोळ्या पुरविणे, तंबाखू तसेच मद्यसेवन न करण्याबद्दल समुपदेशन, नको असलेले गर्भारपण टाळण्याचे- कुटुंबनियोजनाचे मार्गदर्शन, तीव्र रक्तक्षय, रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या मातांची नोंद

व्यसनाधीन महिलांची टक्केवारी शोधून उपाययोजना यामध्ये करण्यात येतील. ‘बीएमआय’ म्हणजे बॉडी मास इंडेक्स १८.५ पेक्षा कमी असलेल्या महिलांची तसेच जोडप्यांच्या संख्येची टक्केवारीच नोंद या उपक्रमात ठेवली जाणार आहे. गरोदरपणामध्ये दिलेली औषधे किती नियमित घेतली जातात, हिमोग्लोबिनची चाचणी करण्याचे प्रमाण किती आहे तसेच तीव्र रक्तक्षय झालेल्या महिलांची टक्केवारीची नोंद करणे यांचा या योजनेत समावेश आहे. गर्भधारणेपूर्वी तंबाखू तसेच मद्यपान थांबवलेल्या महिलांचीही यात नोंद असेल.

कोणत्या बाबींवर लक्ष ठेवणार?

प्रसूतिपूर्व आणि नंतर येऊ शकणाऱ्या समस्या, माता व बाळाला आरोग्याच्या संभाव्य शक्यता, मातेचे वजन आणि बाळाची वाढ आणि बाळाला असणाऱ्या उपचारांची गरज यावर लक्ष ठेवण्यात येइल.

वैद्यकीय प्रतिसाद कसा तपासणार?

उपक्रम राबवल्यानंतर उपजत मृत्यूमध्ये, मुदतपूर्व प्रसूतिमध्ये झालेली घट तपासण्यासह आनुवांशिक व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण किती कमी झाले, हजार दिवसांमध्ये कमी व तीव्र कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी झाले तसेच दोन प्रसूतीमधील अंतरामध्ये झालेली वाढ या निर्देशकांचा अभ्यास होईल.

योजनेकडून अपेक्षा कोणत्या ?

निर्देशांची योग्य अंमलबजावणी झाली तर ही योजना निश्चित मार्गदर्शक ठरू शकते. मात्र आज राज्यात ज्या भागामध्ये माता व बालकांच्या आऱोग्याच्या समस्या गंभीर आहे, तसेच बालमृत्यू व कुपोषण यांच्या समस्येची तीव्रता वाढती आहे, तेथील परिस्थिती अधिक संवेदनशीलपणे समजून घ्यायला हवी. सरकार कुपोषण व बालमृत्यू, कमी वजनाची मुले, अपुऱ्या दिवसांतील प्रसूती, कमी वयातले विवाह यांचा सामाजिक संदर्भ वैद्यकीय अंगाने तपासून पाहत नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत नाही. राज्याच्या वेगवेगळ्या भागात लोकसंख्या, जीवनमान, स्थानिक आहार, स्त्रिया व बालकांचे त्या समाजरचनेतले स्थान यांचाही निर्देशकांमध्ये विचार करायला हवा. ‘वात्सल्य’ची पाखर मगच अधिक उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed