खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नगरमध्ये नुकताच कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार राऊत यांनी नगर शहरातील आमदारांच्या गुंडगिरीवर टीका करताना खासदार डॉ. विखे यांच्या साखर-डाळ वाटपावरदेखील हल्लाबोल केला. खासदार विखे साखर आणि डाळ वाटून आता लोकांकडे मते मागत आहेत, पण त्यांनी विकास कामांवर बोलले पाहिजे. जिल्हयातील राजकारण दोन-चार लोकांच्या हातात, बाकी सगळे गुलाम. त्यांनी लढत राहायचे, घोषणा द्यायच्या, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला जाधव यांनी आगळेवेगळे उत्तर दिले. खासदार विखे कुटुंबियांनी नगर जिल्ह्यात वाटलेल्या साखर-डाळीपासून तयार केलेले प्रसादाचे तीन लाडू खासदार राऊत यांना जाधव यांनी कुरिअर करून राऊत यांच्या मुंबईच्या घराच्या पत्त्यावर पाठवले आहे. या लाडवांच्या प्रसादाबरोबर जाधव यांनी एक पत्रही पाठवले आहे. यात खासदार राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केल्याचे म्हटले आहे.
याबाबत जाधव म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार होती. यानिमित्ताने देशभर आनंदाचे वातावरण होते. खासदार विखे कुटुंबियांनी यानिमित्ताने जिल्ह्यात साखर आणि डाळ वाटून प्रसादाचा लाडू करण्याचा आस्थेवाईक उपक्रम केला. जिल्ह्यातील लाखो कुटुंब या उपक्रमात सहभागी झाले. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी नगर जिल्ह्यात खासदार विखेंनी वाटलेल्या साखर-डाळीतून २१ लाख प्रसादाचे लाडू तयार झाले. खासदार राऊत यांना यात राजकारण दिसले. धार्मिक आस्था दिसली नाही. या टीकेतून त्यांची प्रकृती ढासळल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या प्रकृती स्वास्थेसाठी देखील प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली आहे. दरम्यान, भाजप पदाधिकारी खासदार राऊतांच्या टीकेवर अनोख्या पद्धतीने सटकल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.