• Sat. Sep 21st, 2024

सैन्य दलासाठी ३११ सेवा आणि ८० शौर्य पदकं जाहीर, २२ मराठी सैनिकांचाही समावेश

सैन्य दलासाठी ३११ सेवा आणि ८० शौर्य पदकं जाहीर, २२ मराठी सैनिकांचाही समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्य दलांसाठी घोषित झालेल्या ३११ सेवा व ८० शौर्य पदकांत २२ मराठी सैनिकांचा समावेश आहे. ऑलिम्पिकपटू सुभेदार अविनाश साबळे य़ांना अतिविशिष्ट सेवा पदक घोषित झाले आहे. तर साताऱ्याचे कर्नल ऋषिकेश वाकनीस यांना युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे. आयआयटी मुंबईत शिकलेले एअरमार्शल विभास पांडे यांचा सेवा श्रेणीतील सर्वोच्च परमविशिष्ट सेवा पदकाने सन्मान होणार आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त लष्करी सेवेतील शिपाई व अधिकाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ८० शौर्य पदकांपैकी १२ मरणोत्तर आहेत. त्यामध्ये सहा कीर्ती चक्र या शांतता काळातील दुसऱ्या क्रमांकावरील शौर्य पदकाचा समावेश आहे. सहापैकी तीन कीर्ती चक्र मरणोत्तर आहेत. याखेरीज १८ शौर्य चक्र जाहीर करण्यात आले असून, त्यात दोन मरणोत्तर आहेत. या सर्वांमध्ये २२ पदके मराठी अधिकारी व जवानांना जाहिर झाली आहेत. याआधी विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत झालेले धावपटू सुभेदार अविनाश साबळे यांना आता सेवा श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकावरील अति विशिष्ट सेवा पदक जाहिर झाले आहे. ऑलिम्पिकमधील कामगिरीसाठी हे पदक घोषित झाले आहे. मुंबई आयआयटी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले एअर मार्शल विभास पांडे यांना परमविशिष्ट सेवा पदक घोषित झाले आहे. एअरमार्शल पांडे हे सध्या नागपुरात मुख्यालय असलेल्या हवाईदलाच्या मेंटेनन्स कमांडचे प्रमुख आहेत.

साताऱ्याच्या अधिकाऱ्याचा अनंतनागमधील सेवेचा सन्मान

मूळ साताऱ्याचे असलेले व सातारा सैनिकी शाळेसह राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), आयएमएद्वारे भूदलात रुजू झालेले कर्नल ऋषिकेश वाकनीस हे जम्मू-काश्मीर रायफल्समधील अधिकारी आहेत. अनंतनाग येथे राष्ट्रीय रायफल्सअंतर्गत केलेल्या सेवेबद्दल त्यांना युद्ध सेवा पदक घोषित झाले आहे.

पश्चिम नौदल कमांडचा सन्मान

पश्चिम नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ व्हाइस अॅडमिरल संजय भल्ला यांच्यासह पश्चिम युद्धनौका ताफा प्रमुख व्हाइस अॅडमिरल विनीत मॅकार्थी व नौदल महाराष्ट्र प्रदेशाचे प्रमुख राहिलेले व्हाइस अॅडमिरल ए. एन. प्रमोद या तिघांनाही अति विशिष्ट सेवा पदक जाहिर झाले आहे.

मराठी अधिकाऱ्यांची पदके अशी

सेना पदक (शौर्य)

१. मेजर अभिषेक जोशी

२. मेजर रोहित जोशी

३. सुभेदार पवन सावंत

४. शिपाई चेतन सारापुरे

परम विशिष्ट सेवा पदक

१. लेफ्टनंट जनरल कुलभूषण गवस

२. एअर मार्शल विभास पांडे

अति विशिष्ट सेवा पदक

१. सुभेदार अविनाश साबळे

२. व्हाइस अॅडमिरल संजय भल्ला

३. व्हाइस अॅडमिरल विनीत मॅकआर्थी

४. व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद

युद्ध सेवा पदक

१. कर्नल मनिष लांजेकर

२. कर्नल ऋषीकेश वाकनीस

३. विंग कमांडर विनीत मारवडकर

दुसऱ्यांदा सेना पदक (सेवा)

१. कर्नल सतीश पाटील

विशिष्ट सेवा पदक

१. मेजर जनरल सुजित शिवाजी पाटील

२. मेजर जनरल आशिष सिर्सिकर

३. ब्रिगेडीयर निलेश पागुलवार

४. कर्नल सचिन ठाकूर

५. कर्नल अभिषेक पोतदार

६. व्हाइस अॅडमिरल ए.वाय. सरदेसाई

७. एअर व्हाइसमार्शल प्रशांत करकरे

८. मेजर जनरल राजेश मोघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed