• Mon. Nov 25th, 2024
    माजी कुलगुरूंनी हेरला रामलल्लासाठी पाषाण; गॅब्रो पाषाणात घडली रामलल्लाची मूर्ती, वाचा सविस्तर…

    पुणे: संपूर्ण देशवासीयांना श्री रामलल्लाच्या निरागस आणि मनमोहक मूर्तीने आता भुरळ घातली आहे. पण ही मूर्ती कोणत्या पाषाणात घडवायची असा, प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्याचे उत्तर शोधले पुणेकर कुलगुरूंनी. शेकडो वर्षे टिकावी, अशी मनमोहक मूर्ती गॅब्रो पाषाणात (काळा पाषाण) घडविण्याची सूचना करणारे ते माजी कुलगुरू म्हणजे भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. नितीन करमळकर! गॅब्रो पाषाणात घडलेल्या या मूर्तीची झीज होणार नसल्याने, पुढील शेकडो वर्षे रामलल्ला आपल्या तेजस्वी रूपाने भाविकांना दर्शन देणार आहे.
    वडिलांचा इलेक्ट्रिशियन व्यवसाय; जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर लेकानं गाठलं शिखर, बनला क्लास वन अधिकारी
    अयोध्येच्या नव्या राममंदिरात प्रभू रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली. वस्त्र, हिरेजडीत दागिने आणि मुकुट आदींमुळे सजलेल्या मूर्तीने रामभक्तांची मने जिंकली. ही मूर्ती तयार करण्यासाठी कोणता पाषाण वापरण्यात यावा, यावर साधारण सात महिन्यांपूर्वी तज्ज्ञांनी चर्चा केली. या चर्चेत भारतात आढळणाऱ्या पाषाणांवर प्रामुख्याने चर्चा झाली. रामलल्लाची मूर्ती अधिक आकर्षक स्वरूपात कशी दिसेल. याबाबतची प्रमुख जबाबदारी ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यावर होती. डॉ. देगलूरकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे मूर्तीच्या पाषाणाबाबत विचारणा केली.

    यावेळी झालेल्या चर्चेत क्वॉर्टझाइट, बेसोल्ट, ग्रॅनाईट, चारॉइट अशी काही नावे पुढे आली. त्यावेळी गॅब्रो पाषाणाचे नाव चर्चेत नव्हते. दीर्घकाळ टिकणारा पाषाण म्हणून गॅब्रोचे नाव डॉ. करमळकर यांनी सुचविले. गॅब्रोमध्ये आखीव-रेखीव मूर्ती घडेल आणि हे प्रसन्न रूप अनंत काळ टिकेल, असे करमळकर यांनी तेव्हा सांगितले. त्याप्रमाणे या पाषाणाची निवड झाली. ‘कर्नाटकात मिळणारा गॅब्रो पाषाण वापरावा, असे मी सूचविले होते. त्यानुसार रामलल्लाची सुंदर मूर्ती गॅब्रो पाषाणात तयार झाली. हा क्षण माझ्यासाठी खास आहे. ही मूर्ती आकर्षक होण्यासाठी डॉ. देगलूरकर यांनी कष्ट घेतले’, अशी भावना डॉ. करमळकर यांनी व्यक्त केली.

    गोविंददेव गिरींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना, संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

    कर्नाटकातील गॅब्रो पाषाणच का?
    अभिषेक; तसेच भक्तांच्या स्पर्शामुळे बेसॉल्ट पाषाणातील मूर्तीची झीज होते. त्यामुळे काही काळानंतर मूर्तीला वज्र लेप लावण्याची वेळ येते. गॅब्रो पाषाणातील मूर्ती पाचशे वर्षांपेक्षा अधिक काळ उत्तम स्थितीत राहू शकते. ज्वालामुखीतून निघणारा लाव्हा बाहेर येऊन थंड झाल्यानंतर पाषाण तयार होतो. मात्र, हा पाषाण तितका टिकाऊ नसतो. लाव्हा बाहेर न येता जमिनीच्या आत राहून, थंड झाल्यावर गॅब्रो तयार होतो. दक्षिण भारताच्या अनेक भागांत प्रामुख्याने कर्नाटकात हा गॅब्रो आढळतो. कर्नाटकातील गॅब्रो उत्तम असल्याने या पाषाणाची निवड करण्यात आली. हा पाषाण टिकाऊ असल्याने, त्याला मागणी असते, असे डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed