• Mon. Nov 25th, 2024

    राममंदिर सोहळ्यानिमित्त कोराडी येथे सात हजार किलोचा प्रसाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 22, 2024
    राममंदिर सोहळ्यानिमित्त कोराडी येथे सात हजार किलोचा प्रसाद

    नागपूर दि. 22 : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीत रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा संस्थानद्वारे सात हजार किलोचा रामहलवा प्रसाद आज तयार करण्यात आला. हा प्रसाद तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला सहभाग नोंदवून उपक्रमाला सुरूवात केली.

    आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने शेफ विष्णू मनोहर यांचेद्वारे एकूण सात हजार किलो सामग्रीतून मोठ्या कढईत प्रसाद तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रसाद बनविण्याचे सर्व विक्रम मोडीत निघतील असे उपमुख्यमंत्री म्हणाले. प्रसाद तयार करण्यासाठी हनुमान कढई तयार करण्यात आली असून ही कढई अयोध्येलादेखील जाणार असून तेथेदेखील सर्वाधिक प्रसाद तयार करण्याचा नवीन विक्रम नागपूरच्या नावे प्रस्थापित होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

    तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोराडी मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीची आरती करून दर्शन घेतले. आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंदिराचे विश्वस्त समितीचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

    श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना हा भावनिक आणि परमभाग्याचा क्षण

    अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या येथे देशवासियांच्या स्वप्नातलं भव्‍य राम मंदिर तयार होऊन श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. ज्या क्षणाकरिता संघर्ष केला, तुरुंगात गेलो, तो क्षण आज ‘याचि देही, याची डोळा बघणं’ बघता येणे हा भावनिक आणि परमभाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed