दानवे म्हणाले, शिवसेना ही फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. थोडीशी फुंकर घातली की जो विस्तव आहे ना की त्याला कोणी हात लावला की चटका बसतो. तो येणाऱ्या निवडणुकीत दिसेल. मग ती साताऱ्याचे असेल किंवा महाराष्ट्राचे असेल. शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने काम करते आणि साताऱ्यातील शिवसेना ही त्याच ताकतीने काम करत आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्या शिवसेनेचे तेज दिसेल. शिवसेनेची चाचपणी साताऱ्यात नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या आठ -पंधरा दिवसाचा काळात निर्णय घेण्यात येईल. जागावाटप झाली, की शिवसेना उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करणार आहोत, असं अंबादास दानवे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर रेल्वे स्टेशनवरील कारसेवेसाठी जातानाचा गर्दीतील एक फोटो व्हायरल केला आहे, त्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, तुम्हाला पुरावे सादर करावे लागतात याच्यात सर्व काही आले आहे. पुरावे कोण सादर करतो. पुरावे कोणाला सादर करावे लागतात. ज्याच्याविषयी मनात शंका निर्माण होते आहे, आहे -नाही हा प्रश्न निर्माण होत असेल तर असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून त्याला पुरावे सादर करावे लागतात यातच शिवसेनेचे यश आहे, असंही दानवे यांनी म्हटलं.
पुढे ते म्हणाले, बाबरीचा ढाच्या पाडण्यात कोण होते, कोणी शेपूट घातलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले होते, की शिवसैनिकांनी हे काम केले असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे. नुसते म्हटले नव्हते, तर भाजपाच्या लोकांनी सांगितले आहे. त्यातील काही शिवसैनिक आता सुद्धा आहेत, म्हणून मला वाटते की शिवसेनेला या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीने किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत विचारले असता, ते म्हणाले, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे. सरकारने स्वतः वारंवार तारखा दिलेल्या आहेत. आजपर्यंत दोनदा दिलेल्या आहेत. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आहे. मला वाटतं यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे. त्याला अनेक मार्ग आहेत, केंद्रातील भाजपचे सरकार आणि महाराष्ट्रातील सरकार यांना करायचे की नाही करायचे की समाजामध्ये जाती-जातीत भांडणे लावायचे आहेत, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होतोय. मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची भूमिका आहे त्याला शिवसेनेचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
देशभरात ईव्हीएम मशीनला विरोध होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ईव्हीएम मशीनला विरोध नाही, तर व्हीव्हीपॅटला आहे. व्हीव्हीपॅट हे कंट्रोल होऊ शकत हे तंत्रज्ञानानुसार सिद्ध झाले आहे आणि त्याला लोक विरोध करत आहेत. मग लोक विरोध करत असतील तर सरकारने याबाबत भूमिका घेतली पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ईव्हीएमला विरोध नाही, तर व्हीव्हीपॅटला आहे हे लक्षात घ्यावे, असंही दानवे यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, मला वाटतं, मागील वर्षाच्या दावोस दौऱ्यानंतरच्या गुंतवणूकबाबतची स्पष्टता समोर आली नाही. जे गुंतवणूकदार सांगितले आहेत ते येथीलच आहेत. त्यांच्या खात्यात एक रुपया सुद्धा अजून जमा झालेला नाही. गुंतवणूक केली आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे, तशी गुंतवणूक कुठेही झालेली नाही. उलट ज्या पद्धतीने ४०-५० लोक सरकारी खर्चाने जवळपास ३४ ते ४० कोटी रुपये हा महाराष्ट्राच्या जनतेचा हा पैसा खर्च करून रिकामे हात हलवत मुख्यमंत्री व त्यांचे शिष्टमंडळ आलेले आहे, असाही आरोप त्यांनी केला.
Read Latest Maharashtra News And Marathi News