• Mon. Nov 25th, 2024

    महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Jan 19, 2024
    महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    सोलापूर, दिनांक 19(जिमाका):- उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मॉल निर्माण करण्यास सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य तथा पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी केले.

    उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत रंगभवन जवळ वोरोनाका प्रशालेमध्ये पुणे व छत्रपती संभाजीनगर या दोन विभागाचा 19 जानेवारी ते  21 जानेवारी 2024 या कालावधीत मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची दीर्घकाळ साठवणूक होणे ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज ची आवश्यकता आहे. तरी असे कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून एक कोटी सहा लाखाचा निधी उपलब्ध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

    आजच्या महिलांचा उच्चशिक्षित होण्याकडे कल अधिक वाढत आहे. महिलांनी शिक्षण घेऊन हाऊस वाइफ ही ओळख न ठेवता कुटुंबाला आर्थिक सहकार्य करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करावे त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण ही घ्यावे असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी करून अमरावती प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात ही महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंसाठी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. उमेद च्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटासाठी करण्यात येत असलेल्या कामाबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

    यावेळी प्रास्तविकामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी आज जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला कठोर परिश्रम घेऊन विविध वस्तूंची निर्मिती करत आहेत.त्यांच्या वस्तूंचे ब्रँडिंग करण्यासाठी अॕप निर्मिती , आॕनलाईन करणे यासाठी लवकरच प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता घाडगे यांनी तर आभार जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले. या मिनी सरस व रुक्मिणी महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे,सहाय्यक लेखाधिकारी सुर्यकांत तोडकरी, शितल म्हांता, अमोल गलांडे, सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.

    जिल्हास्तरीय रुक्मणी महोत्सवास भेट देण्याचे आवाहन-

    जिल्ह्यातील नागरिकांनी उमेद च्या माध्यमातून दिनांक 19 ते 21 जानेवारी दरम्यान रंगभवन जवळील वोरोनाका प्रशाला च्या प्रांगणात आयोजित मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्रीस भेट देण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    या महोत्सवात महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात आलेले असून या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन येथे बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन ही आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *