• Sun. Sep 22nd, 2024

राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीर‍ित्या राबवावी; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

ByMH LIVE NEWS

Jan 18, 2024
राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीर‍ित्या राबवावी; केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना

मुंबई, दि. १८ : मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी उत्कृष्ट योगदान देत राज्यातील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या राबवावी, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले.

मुंबई येथे भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच आणि राज्यातील आगामी लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.  वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धर्मेंद्र शर्मा, नितेश व्यास यांच्या नेतृत्वाखाली,  हिरदेश कुमार आणि  अजय भादू, दोन्ही उप-निवडणूक आयुक्तांसह तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, कायदा अंमलबजावणी संस्थांचे नोडल अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत १६ ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत ही आढावा बैठक झाली.

यावेळी आयोगाच्या वरिष्ठ अधिका-यांनी राजकीय पक्षांसह सर्व संबंधित भागधारकांचा समावेश असलेल्या मुक्त, निष्पक्ष, सर्वसमावेशक आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विशेषतः अपंग व्यक्ती, ट्रान्सजेंडर आणि विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांसह उपेक्षित गटांकडून मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यावर भर दिला. तसेच महिला, तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही दिले. क्षेत्र भेटीद्वारे गंभीर आणि असुरक्षित मतदान केंद्रे ओळखण्याचे आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना देण्यात आले. विशेषतः त्रुटीमुक्त मतदार यादी आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी अत्यंत पारदर्शकतेने करण्याबाबत तसेच सर्व तक्रारींचा विहित मुदतीत निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या.

भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, काही प्रशासकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/प्रधान सचिव यांची भेट घेतली आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पायाभूत सुविधा इत्यादींची खात्री करण्याबाबत काही निर्देश दिले.

सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस आयुक्त, अधीक्षक यांच्यासह आयोजित केलेल्या विशेष बैठकीत लोकसभा-२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीबाबत भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासमोर त्यांचे तपशीलवार सादरीकरण केले. पोलीस आयुक्त/अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, प्रतिबंधात्मक कारवाई आणि रोख रक्कम, दारू आणि इतर अमली पदार्थ जप्त करण्याबाबतची अंमलबजावणी स्पष्ट केली. पोलिस विभाग आणि इतर अंमलबजावणी संस्थांनी अनधिकृत रोकड, दारू, ड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर दक्षता वाढवावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळाने दिले.

000

वंदना थोरात/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed