• Sat. Sep 21st, 2024

नाशकात ठाकरे गट,शिंदे गट आमने सामने; गोदाकाठावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले

नाशकात ठाकरे गट,शिंदे गट आमने सामने; गोदाकाठावर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले

म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक

उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गोदाघाटावर पाहणीसाठी आलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि ‌शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आमने सामने ऐवून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. उबाठाचे खासदार विनायक राऊत व वरुण सरदेसाई यांच्यासमोर शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामकुंड परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.परंतु, पंचवटी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना समज दिल्याने अनर्थ टळला.

ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे २२ जानेवारीला नाशकात दाखल होणार असून, ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे गोदाघाटावर त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे.

या दौऱ्याच्या तयारीच्या यानिमित्ताने खा. विनायक राऊत व ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई बुधवारी(दि.१७) नाशिक दौऱ्यावर आले होते.तर शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे नाशकात बुधवारी युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे गटाच्या युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरदेसाई व पालकमंत्री दादा भुसे हे देखील नाशिकमध्ये आले होते. पालकमंत्री भुसे यांनी या कार्यक्रमानंतर गोदाघाटाचा पाहणी दौरा केला. दोन्ही गटाचे पदाधिकारी गोदाघाटावर एकाचवेळी पोहोचले. यावेळी शिंदे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचाही प्रकार घडला. त्यामुळे रामकुंड परिसरात तणावाचे वातावण निर्माण झाले होते.अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.

पोलिसांकडून युवासेनेला समज

दोन्ही गटाच्या नेत्यांनी शांततेची भूमिका घेतल्यामुळे तसेच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र यानंतर पंचवटी पोलिसांनी शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार, योगेश म्हस्के, दिगंबर नाडे, रुपेश पालकर आदींना पोलीस ठाण्यात पाचारण करत ‘समज’ दिल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed