• Mon. Nov 25th, 2024
    जरांगे मुंबईत येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषणाला सुरूवात, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा प्लॅन…

    अक्षय शिंदे, जालना : मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनासाठी दोन टप्प्यात आमरण उपोषण केल्यानंतर आता थेट मुंबईत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जरांगे जालन्यातील अंतरवालीपालून मुंबईपर्यंत पायी प्रवास करणार आहे. अंतरवाली सराटीतून २० जानेवारी रोजी मुंबईकडे ते रवाना होतील तर २६ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार असल्याची माहिती त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आज १५ जानेवारीला मराठा आरक्षणासाठी उपोषण आणि आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा मार्ग, प्रवासातील मुक्काम कुठे असणार यासंदर्भात माहिती दिलीय.

    असे आहेत अंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे…

    २० जाने सकाळी ९ वाजता अंतरवली मधून निघणार
    २० जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात.
    २१ जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)
    २२ जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
    २३ जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे
    २४ जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
    २५ जानेवारी सहावा मुक्काम – वाशी, नवी मुंबई
    २६ जानेवारी सातवा मुक्काम आझाद मैदान आंदोलनस्थळी

    २० जानेवारीला मनोज जरांगे हे जालन्यातील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहे. मराठवाड्यातील मराठा बांधवांनी २० जानेवारीला मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवाना पाठिंबा दर्शविण्यासाठी अंतरवालीत यावं, असं आवाहन जरांगेंनी केलंय.

    घरची चूल बंद ठेवणार, मुंबईला निघालेल्या मराठा बांधवांच्या सेवेसाठी नगर जिल्ह्यात पेटणार चुली

    आपण वारीला चाललो नाही

    मुंबईला जात असताना गडबड गोंधळ करायचा नाही. दमाने जायचं, देव पळून जातील असं काही नाही आपण वारील चाललो नाही, देव प्रसन्न नाही करायचा. सकाळी ८ वाजल्या पासून १२ पर्यंत चालत जाऊ. आपण देवाकडे जात नाही, आपल्या मागण्यासाठी सरकारकडे जातोय, ज्याला जमेल त्याने चालायचे, नाहीतर बिनधास्त गाडीमध्ये बसायचे, असं जरांगे पाटील म्हणाले.

    दररोज नव्वद-शंभर किलोमीटरचा प्रवास

    अंतरवाली ते मुंबईकडे जाताना रोज दहा ते पंधरा किंवा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला मुंबईला जायला एक महिना लागेल. त्यामुळे रोज ९० ते १०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे, असंही जरांगे पाटलांनी सांगितलं.

    तुमच्याकडे १० लाख गाड्या तर, आमच्याकडे २ हजार गाढवं, मेंढरं तयार… ओबीसी नेत्याचा मनोज जरांगेंना इशारा

    आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

    आम्ही सरकारकडे मुंबईत उपोषणासाठी परवानगी मागितली आहे. सरकारने परवानगी देऊ अथवा नये, तरी आम्ही जाणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी बोलून दाखवला. मी एकटा असो किंवा एक लाख असो किंवा एक कोटी असो.. मी मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, असंही ते म्हणाले.

    सरकार मुंबईत येणाऱ्या मराठ्यांची आकडेवारी काढतंय पण तुमचे गणित कोलमडून जाणार | मनोज जरांगे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed