• Sat. Sep 21st, 2024
संभाजीराजेंच्या मनात नेमकं काय? लोकसभा निवडणुकीआधी मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मविआसोबत चर्चा सुरु

कोल्हापूर: राष्ट्रपती नियुक्त खासदार केल्याने भाजपचे सहयोगी सदस्य झालेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची पावले आता महाविकास आघाडीच्या दिशेने पडत आहेत. ‘स्वराज्य’ संघटनेला या आघाडीचे घटक करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेसाठी ते इच्छूक असल्याने कोल्हापूर, नाशिक अथवा मराठवाड्यातील एखाद्या मतदार संघातून लढण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पण, संघटनेऐवजी पक्षप्रवेशाचा पर्याय आघाडीकडून दिला असल्याचे समजते.

कोणत्याही पक्षात नसलेले संभाजीराजे २००९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या मैदानात उतरले. तेथे अपयश आल्यानंतर राजकारणापासून थोडं दूर राहून समाजकारणावर भर दिला. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने ते राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. भाजपच्या पुढाकाराने खासदार झाल्याने त्या पक्षाचा शिक्का मारला गेला. पण, सहा वर्षे ते पक्षात फारसे सक्रीय झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा संधी देताना त्यांच्या नावाला प्रथम पसंती मिळाली नाही.

मुख्यमंत्री दिल्लीची धुणीभांडी करतात, कल्याणमध्ये जात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. राज्यात लोकसभा आणि विधानसभा लढविण्याची त्यांनी घोषणा केली. पण, संघटनेच्या मर्यादा असल्याने आता स्वतंत्र ऐवजी सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुळात या संघटनेला भाजपचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी चर्चेला तयार नव्हती. पण, गेल्या दोन महिन्यापासून अचानक महाविकास आघाडीबरोबर जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, त्यातून चर्चाही सुरू झाली आहे.

संभाजीराजेंची लोकसभेच्या मैदानात उतरण्याची इच्छा आहे. मागील आठवड्यात त्यांनी जाहीरपणे ती बोलून दाखविली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपात स्पर्धा आहे. त्यामुळे स्वराज्य संघटनेला जागा देण्याऐवजी संभाजीराजेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचे समजते. त्यांना कोणती जागा द्यायची याबाबतही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून आमदार सतेज पाटील यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने महिनाभर विविध कार्यक्रम घेत वातावरण निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

चौकट

खासदार केल्याने संभाजीराजेंवर भाजपचा शिक्का आहे. तो बसू नये म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्यामध्ये ते शंभर टक्के यशस्वी झाले नाहीत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेली जवळिकता त्यामध्ये आड येत आहे. कोल्हापूरातून लढण्याची त्यांची इच्छा आहे. जुन्या जखमा भरून काढण्यासाठी ते मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

कोट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबर स्वराज्य संघटनेची चर्चा सुरू आहे. सध्या तरी आपली पसंती महायुती नव्हे, तर महाविकास आघाडी आहे. कोणत्या जागेवरून लढायचे हे लवकरच ठरेल.

संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

सर्वांसाठी दारं खुली, संभाजीराजेंचंही स्वागत, पण वरिष्ठांच्या निर्णयाची कल्पना नाही : सतेज पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed