देशातील उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचं प्रतिनिधीत्व मिलिंद देवरांनी दोनवेळा केलं. २००४ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. पण त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. २०१९ मध्येही याच निकालाची पुनरावृत्ती झाली. आता काही महिन्यांवर लोकसभा निवडणूक आली आहे. या निवडणुकीसाठी देवरा उत्सुक आहेत.
ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत आहे. दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार असलेले अरविंद सावंत ठाकरेंसोबत आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर ठाकरेंनी दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी देवरांनी बरेच प्रयत्न केले. त्यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत जावून हायकमांडशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना भेटीसाठी वेळ न दिल्यामुळे या नाराजीत आणखी भर पडली. अखेर त्यांनी आपला राजीनामा जाहीर केला.
देवरांचा राजीनामा, मतदारसंघात समीकरणं बदलणार?
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी देवरा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. विद्यमान खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत असल्यानं या मतदारसंघात शिंदेंकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. पण देवरांच्या पक्षप्रवेशामुळे दक्षिण मुंबईतील समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलतील. देवरांच्या रुपात आता शिंदेंकडे तुल्यबळ उमेदवार आहे.
देवरांच्या पक्षांतरामुळे भाजपची गोची?
दक्षिण मुंबईत शिंदेंकडे प्रबळ उमेदवार नसल्यानं भाजप या मतदारसंघावर दावा करण्याच्या तयारीत होता. ही शक्यता आजही कायम आहे. या मतदारसंघातील सहापैकी दोन आमदार भाजपचे आहेत. मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर या दोन्ही आमदारांची नावं लोकसभेसाठी चर्चेत आहेत. पण आता देवरांमुळे शिंदेंना तगडा नेता मिळू शकतो. त्यामुळे शिंदे गट या मतदारसंघावर दावा करू शकतो. अशा परिस्थितीत भाजपची गोची होऊ शकते.
देवरा पुन्हा खासदार होणार, पण…
मिलिंद देवरांचा शिंदे गटातील प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील सहापैकी तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. पैकी एक आमदार शिंदेसेनेत गेला. यावेळी भाजप दक्षिण मुंबई मतदारसंघासाठी आग्रही आहे. अशा परिस्थितीत मिलिंद देवरांना शिंदेंची शिवसेना राज्यसभेवर संधी देऊ शकते. तशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दिल्लीत देवरांच्या नावाला वेगळं वजन आहे. त्यांनी केंद्रात मंत्री म्हणून काम केलं आहे. याचा फायदा शिंदेंना दिल्लीत, पर्यायानं केंद्रीय राजकारणात होऊ शकतो.
ठाकरेंचा शिलेदार पडणार?
मिलिंद देवरांनी काँग्रेसचा हात सोडल्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसतील. त्यांच्या सोबत १० माजी नगरसेवक, २० पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करू शकतात. मतदारसंघातील उद्योजकांशी, व्यापाऱ्यांशी देवरांचे जवळचे संबंध आहेत. हे संबंध कित्येक वर्षांपासून जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. मुकेश अंबानी दक्षिण मुंबईचे मतदार आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत देवरांना पाठिंबा दिला होता. आता देवरा शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यास त्याचा फटका ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांना बसेल.
…तर भाजपला फायदा
मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवल्यास सावंत यांना निकराची झुंज द्यावी लागेल. देवरांना मानणारे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यामुळे सावंत यांना निवडणूक जड जाऊ शकते. दोनवेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरीही देवरांचा मतदारसंघातील जनसंपर्क दांडगा आहे. सामाजिक उपक्रमांमधून ते सातत्यानं लोकांच्या संपर्कात असतात. देवरांना राज्यसभेत संधी देण्यात आली आणि हा लोकसभा मतदारसंघ भाजपकडे गेला तरीही ठाकरेंसाठी वाट बिकट असेल. भाजपकडे मतदारसंघात दोन आमदार आहेत. शिंदेंचा एक आमदार आहे. या सगळ्याला देवरांच्या ताकदीची जोड मिळाल्यास ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत धक्का बसू शकतो.