• Sat. Sep 21st, 2024

विकासकामांच्या माध्यमातून बारामती परिसराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

ByMH LIVE NEWS

Jan 13, 2024
विकासकामांच्या माध्यमातून बारामती परिसराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १३ :  विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामती तालुक्याच्या सर्वागिण विकास करुन  नागरिकांना उत्तम सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत; आगामी काळातही विविध विकासकामे कामे करावयाची असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती येथे अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघातर्फे गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव, बिरजू मांढरे, माजी नगरसेवक समीर चव्हाण, अभिजित चव्हाण, अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघाचे अध्यक्ष डॉ.ऋतुराज काळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, बारामती परिसरातील नागरिकांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेले महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि गरजू नागरिकांना घरे मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिसर विकासाच्यादृष्टीने विविध दूरगामी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा शुभोभिकरण, कऱ्हा नदी शुभोभिकरण, नवीन प्रशासकीय भवनाच्या शेजारी सेंट्रल पार्क, रस्ते बांधणी अशी विविध विकास कामे सुरु आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या भाजी मंडईचे गाळे पाडण्यात आले असून तेथील गाळे धारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गाळेधारक, ग्राहकांची सुरक्षितता, वाहनतळ आदी बाबीचा विचार करुन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आगामी काळात परिसरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी उद्यान, बगीचे, क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था मदत करीत आहेत. सार्वजनिक विकासकामे दर्जेदार, गतीने वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न

महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन दिल्याशिवाय  प्रगती होत नाही. महिलांचे राष्ट्र निर्मितीच्या कामात मोठे योगदान आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

काळे परिवाराचे बारामती परिसरातील सामाजिक कार्यात योगदान

स्व. वस्ताद बाजीराव काळे यांनी कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती तसेच सामाजिक कार्यात योगदान दिले होते. डॉ.ऋतुराज काळे नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बारामती परिसराच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यांनी परिसरातील शाळेसाठी भूखंड दिला असून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मुलांच्या सोईच्यादृष्टीने उत्तम आराखडा अंतिम करुन याठिकाणी दर्जेदार शाळा उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साड्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री. गुजर यांनी आपले विचार व्यक्त केले.

अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,  न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed