• Sun. Sep 22nd, 2024

तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं; तरूणाई, उत्साह अन् जल्लोष, तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

ByMH LIVE NEWS

Jan 12, 2024
तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं; तरूणाई, उत्साह अन् जल्लोष, तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

नाशिक, दि.12 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कला – कौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. ‘विकसित भारत @२०४७ – युवा के लिए – युवा द्वारा’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात तालबद्ध जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिकांचे युवक – युवतींनी बहारदार सादरीकरण केले. राष्ट्रीय युवा महोत्सवातील देशभक्तीपर गीतांमुळे सांस्कृत‍िक कार्यक्रमात रंगत आली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. एकाहून एक  सरस, कला – कौशल्य दाखविताना तरूणाईची चपळता पहायला मिळाली‌.

तपोवन मैदानावर आज स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रासाठी ‘सक्षम युवा – समर्थ भारत’ या घोषवाक्यावर आधारित या महोत्सवात तरूणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत असून नाशिकमध्ये देशातील विविध राज्यातील तरूणाईचा मेळा अवतरला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर‌ भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे प्रधानमंत्र्यासमोर संचलन झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. जिम्नॅस्टिकचे कौशल्य पाहून उपस्थित आवाक झाले. महाराष्ट्राच्या तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती करून दाखवत उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. ढोल, झांज, लेझीम, कथकली, भरतनाट्यम्, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

तरूणांनी सादर केलेल्या साहसी शारीर‍िक कसरती, प्रात्यक्ष‍िकांच्या जोडीला सायकलिंग आणि स्केटिंगचे मनोवेधक सादरीकरण केले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.

नाशिकच्या ढोल‌ पथकानं वेधलं लक्ष

संचालनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली.  सुमारे १० मिनिटे चाललेल्या संचालनात ढोल पथकाच्या निनादात आसमंत ढवळून निघाला होता‌. ५० युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌ होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed