नवी मुंबई, दि. 11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घेतला. नवी मुंबई येथील विमानतळाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंडप व्यवस्थेची, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या एक लाखाहून अधिक महिला आणि मान्यवरांसाठीच्या सेवा सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली.
यावेळी ‘एमएमआरडीए’चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, एमएमआरडीए चे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेबाबत व्यक्तिशः तपशिलवार आढावा घेतला, कार्यक्रमस्थळाची पाहणी केली तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
०००००