• Sat. Sep 21st, 2024

कोकणातील लोरे गावच्या सुपुत्राची कला पोहोचणार अयोध्येत; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान लाईव्ह पेंटिंग

कोकणातील लोरे गावच्या सुपुत्राची कला पोहोचणार अयोध्येत; राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान लाईव्ह पेंटिंग

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील लोरे गावचे भूषण चित्रकार शैलेश मनोहर गुरव अयोध्येतील परिक्रमा मार्गावर अमृतकाळात लाईव्ह पेंटिंग करणार आहे. अयोध्येतील श्रीराममंदिरात या कलाकृती संग्रहित करण्यात येतील. भारतभरातून निवड झालेल्या २० कलाकारांमध्ये शैलेश याचा समावेश असून या कलाकृतींचे प्रदर्शन अयोध्या येथे भरवण्यात येणार आहे.

भक्ती, संस्कृती आणि कला यांचा अद्भुत संगम भगवान श्रीरामांच्या नगरीत पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम प्राण प्रतिष्ठा समारोहाची सुरुवात होणार आहे. २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा मुख्य समारोह होणार असला तरी सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात आधीपासूनच होईल.

या प्रसंगी जगद्‌गुरू राम भद्राचार्य द्वारा संचालित ट्रस्ट रामानंद मिशन तर्फे अयोध्येत ‘अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून वाची आर्ट लाईव्ह पेंटिंग या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी जेव्हा जगभरातून राम भक्त अयोध्येत येतील तेव्हा त्यांना वाची आर्ट लाईव्ह पेंटिंगही पाहता येणार आहे. या उपक्रमात २० चित्रकार भाग घेणार आहेत. श्रीराम मंदिराचे उदघाटन हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. या निमित्ताने भारतीय कलेचे प्रदर्शन होणे ही अभिमानाची बाब आहे.


शैलेश हा मूळचा कोकणातला असल्याने कोकणाबद्दल ओढ लावणारी वैशिष्ट्यपूर्ण दृश्ये, प्रतिमा आणि जीवनशैली ही चित्रकार शैलेश याची पहिली पसंती राहिली आहे. त्याच्या चित्रकृतींमधून तो कोकणपुत्र असल्याची आणि गावच्या मातीशी त्याची नाळ घट्ट जुळलेली आहे हे नेहमीच दिसून येते. हल्ली सोशल मीडिया फोफावल्यामुळे आपण ही दृश्य मोबाईलमध्ये कैद तर करतो पण चित्राच्या माध्यमातून यांचं सौंदर्य पाहण्याची मजा काही और असते. पण चित्रकार शैलेशची चित्रे यापुरतीच मर्यादित न राहता अनेक बारीक पण महत्त्वपूर्ण पैलूंचे दर्शन तो आपल्या चित्रांच्या माध्यमातून घडवतो. कोकणातील दुर्मिळ होत चाललेल्या वस्तूंचे नितांत सुंदर दर्शन घडवताना शैलेशने आपल्या कलात्मकतेने सर्व कलारसिकांना चित्ताकर्षक दर्शन घडवले आहे. त्याच्या चित्रांत असलेली पारदर्शकता व उदात्तता तसेच पुरेशी आध्यात्मिकता ह्यांचा समन्वय यथार्थतेने साधलेला दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed