या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने ‘२४ बाय ७’ पाणी पुरवठ्यासाठी देशभरातून ६१० प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यापैकी ५९० प्रकल्प महापालिका क्षेत्रांशी निगडित असून, ते तीन वर्षांत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी या प्रकल्पांना ‘अमृत’ योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे.
कोइम्बतूरमध्ये या योजनेचे काम प्राथमिक स्तरावर आहे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये तीस ते चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे. शहरात ‘पुरी मॉडेल’ राबवण्याच्या उद्देशाने सुमारे दीड वर्षापूर्वी डॉ. अभिजित चौधरी पालिकेचे आयुक्त असताना केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेचे प्रमुख अधिकारी व इस्रायलचे शिष्टमंडळ शहरात आले होते. त्यांनी शहराचे सर्वेक्षण केले आणि त्याचा अहवाल शासनाला सादर केला. या सर्वेक्षणासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला होता. सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर शहरात ’२४ बाय ७’ पाणी पुरवठा करणे शक्य आहे असा निष्कर्ष काढण्यात आला, त्यासाठी मीटरिंगचा पर्याय मांडण्यात आला.
दृष्टिक्षेपात प्रकल्प
– ‘२४ बाय ७’ पाणीपुरवठ्याचा प्रकल्प जगन्नाथपुरीमध्ये यशस्वी
– छत्रपती संभाजीनगर आणि कोइम्बतूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प राबवला जाणार
– छत्रपती संभाजीनगरमध्ये योजनेचे काम सुरू असून, डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
– योजनेचा प्रारंभिक खर्च १६८० कोटी रुपये होता, तो वाढून २७४० कोटी रुपयांवर गेला
घरोघरी मीटर बसणार
– प्रत्येक घराच्या नळ कनेक्शनला मीटर बसवले जाणार
– त्याचा खर्च सुरुवातीला शासकीय निधीतून केला जाणार
– पाण्याचा जेवढा वापर तेवढेच बिल नागरिकांना येईल
– १२ मीटर उंचीच्या इमारतीला (चौथ्या मजल्यापर्यंत) नळाद्वारे पाणी मिळणे शक्य होणार