• Sat. Sep 21st, 2024

शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – मंत्री शंभूराज देसाई

ByMH LIVE NEWS

Jan 2, 2024
शिवणी विमानतळ धावपट्टी लांबीबाबत जिल्हा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 2 : अकोला शहराजवळील शिवणी विमानतळाची धावपट्टी वाढवून विमानतळावरून विमान वाहतूक सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शिवणी विमानतळ धावपट्टीच्या 1800 मीटर लांबीकरीता जागेची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र  ही धावपट्टी 2500 मीटर पर्यंत वाढविण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये 1800 मीटर धावपट्टी वाढवून  विमानतळ सुरू करणे व 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवून ‘नाईट लॅण्डिग’ सुविधेसह सुरु करणे या दोन्ही प्रस्तावांचा अकोला जिल्हाधिकारी स्तरावर छाननी करून तुलनात्मकदृष्ट्या परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनास सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयात अकोला जिल्ह्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला आमदार अमोल मिटकरी, महाराष्ट्र विमानपत्तन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अपर जिल्हाधिकारी दीपक नरवडे, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विभागीय व्यवस्थापक माया चौधरी, श्री. त्रिपाठी, सामान्य प्रशासन विभागाचे श्री. गावडे उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आमदार सर्वश्री रणधीर सावरकर, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, विमानतळाची 2500 मीटरपर्यंत धावपट्टी वाढवायची असल्यास आवश्यक असणाऱ्या खासगी जमिनीचे संपादन करावे लागेल. याबाबत संबंधित जमीनधारकांना बोलावून जिल्हा प्रशासनाने एक दर ठरवून घ्यावा. संबंधित जमिनीवर असलेले बांधकाम, पडीक जागा यानुसार दर ठरवावा. त्यानुसार जमीन धारकांना मोबदला देण्यात यावा. तसेच विमानतळ दोन टप्प्यात सुरू करण्याबाबत चाचपणी करावी, असा सर्वंकष प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार करून शासनाकडे सादर करावा. याबाबत आवश्यक निधीची व्यवस्था करण्यात येईल.

बैठकीत आमदार श्री. मिटकरी, श्री. सावरकर, श्री. खंडेलवाल यांनी सूचना केल्या

****

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed