कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण राहणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव यावेळी उपस्थित राहणार आहेत. संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार तर जैन उद्योग समूहाला डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्यावतीने सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना दिला जाणार आहे. संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आमदार सत्यजित तांबे व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, जयंती महोत्सव समिती व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.
थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण
या निमित्ताने सहकारी साखर कारखान्याच्या नव्या कार्यालयाच्या समोर उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. याशिवाय १२ जानेवारीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमही संगमनेरमध्ये होणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीतील नेते संगमनेरमध्ये येणार असल्याने थोरात यांचे एकप्रकारे शक्तिप्रदर्शनही होणार आहे.