मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी जवान भानुदास पाटील हे भारतीय सैन्य दलातील भुज येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंन्ट्री ब्रिगेड येथे ते सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास पाटील यांचा शनिवारी, ३० डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान शहीद जवानाची वार्ता कुंसुबेला धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी कुसुंबे येथे आणण्यात आले.
त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन ‘अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’ सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. वीर जवान भानुदास पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फेरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल आणि माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन यांनी मुखाग्नी दिला. त्यांचे मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, आपल्या जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भानुदास पाटील यांच्या कुटुंबीयांस महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी वीर जवान भानुदास पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उसळला होता.