• Sat. Sep 21st, 2024

पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी

पतंगांवरही ‘मोदी’! उत्सवाचे ‘गुजरात कनेक्शन’, विविधरंगी कापडी पतंगांनाही वाढली मागणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गारूड देश-विदेशात आहेच; शिवाय बच्चेकंपनी व तरुण वर्गातही त्यांची क्रेझ कायम असल्याचे चक्क पतंगांवरुन दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित यंदाच्या पतंगांवरही ‘मोदी २०२४’ची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत आणि २०२४ च्या निवडणुकीतही मोदींचाच पतंग उंच झेपावणार की काय, अशा अंदाजाने या पतंगांची विक्री सुरू झाली आहे. अर्थात, बहुतांश पतंग व पतंगांचे साहित्य हे गुजरातहून येत असल्याने ‘गुजरात कनेक्शन’ही या चित्रांना कारणीभूत असू शकते, अशा शंकेला स्थान असल्याचे स्पष्ट होत आहे.

पूर्वीप्रमाणे पतंगांचा शौक काहीसा कमी झाला असला तरी अजूनही डिसेंबर सरत आला, की पतंगबाजीला उधाण येते, असे दरवर्षीच पाहायला मिळते. त्यातच नाताळच्या सुट्ट्या लागल्यावर कितीतरी बच्चे कंपनीला पतंगबाजीचा मूड लागतो आणि जमेल तिथे पतंगबाजी सुरू होते. सध्या असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातही जुन्या वस्त्यांमध्ये हे चित्र अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. अर्थात, काळानुरुप पतंगांमध्ये अधिक प्रमाणात वैविध्य पाहायला मिळत आहे. यंदा तर कागदी पतंगदेखील बहुरंगी ढंगात विक्रीस आल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा कागदी पतंगांबरोबरच कापडी पतंगांचे क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कदाचित छोट्या आकारापासून ते अगदी मोठ्या आकारापर्यंतचे अधिकाधिक आकर्षक असे कापडी पगंत विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी पातळ प्लास्टिकचेही पतंगही कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. अलीकडे समस्त पतंग हे पूर्वीप्रमाणे साधे-सुधे न राहता कमालीचे आकर्षक करण्यात आल्याचेही सहज दिसून येत आहे. त्यामुळे अशा सगळ्याच पतंगांवर बाहुबली, छोटा भीम, मोटू-पतलू अशा कितीतरी कार्टूनची चित्रे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचवेळी ‘मोदी २०२४’ असा नामोल्लेख असलेले पतंगही लपून न राहता आवर्जून लक्ष वेधून घेत आहेत. यावरील मोदींचे मोठे चित्र व ‘२०२४’चा उल्लेख हे सरळसरळ निवडणुकांच्या दिशेने अंगुलीनिर्देश करीत असल्याचे जाणवल्याशिवाय राहात नाही. असे कापडी पतंग १०० रुपयांपासून ते अगदी ४०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. तर, पाच रुपयांपासून २० रुपयांपर्यंत कागदी पतंग विक्रीस उपलब्ध आहेत.

साहित्यांतही मोठे वैविध्य

पतंगांबरोबरच पतंगांचे विविध प्रकारचे साहित्यही बच्चेकंपनीला खुणावत आहे. पूर्वीपासून मिळणारी व खास पतंगांसाठी वापरली जाणारी २४ नंबरची पांढरी जाड दोरीही विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ही दोरी १० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत विविध प्रकारांत उपलब्ध आहे. तसेच वर्षानुवर्षांपासून येणारा बरेलीचा मांजाही बाजारात उपलब्ध आहे आणि त्याची २० ते ३० रुपये तोळा अशा भावाने विक्री होत आहे. चक्रीसुद्धा आकर्षक स्वरुपात व विविध आकारात उपलब्ध झाली आहे आणि ५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत चक्रीची विक्री होत आहे.

पतंगांची विक्री आता सुरू झाली आहे आणि अगदी छोट्या आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे पतंग विक्रीस उपलब्ध आहे. पुन्हा मागणीनुसार यंदा कापडी पतंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहेत. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यही उपलब्ध असले तरी, धोकादायक असलेला नायलॉन मांजा आम्ही विकत नाही.-निखिल मकरिये, विक्रेते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed