घोडबंदर रोड येथील मानपाडा भागात निळकंठ ग्रीन परिसरात ओलिविया व्हेरेथाॅन ही बहुमजली इमारत आहे. या इमारतीच्या ३१ व्या मजल्यावर वर्षा उपाध्याय तिच्या नातेवाईकांकडे उत्तरप्रदेश येथील मूळ गावावरून सहा महिन्यांपूर्वी राहण्यास आली होती. एकीकडे अकरावीचे शिक्षण घेत वर्षा नातेवाईकाच्याच घरी घरकाम करत होती. अवघ्या काहीच दिवसांपूर्वी तिने गावी आईला फोन करून याठिकाणी राहण्याची इच्छा होत नसल्याचे सांगितले. मात्र उज्ज्वल भविष्य आणि उत्तम शिक्षणासाठी तिकडेच राहा, अशी तिची आईने समजूत काढली.
रविवारी तिने आईला फोन केला. मात्र आईने फोन घेतला नाही. त्यानंतर मामालाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. अखेर तिने सोमवारी सकाळी घरातील बाल्कनीत येऊन थेट खाली उडी मारत जीवन संपवले. हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून तिच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. मृत वर्षा हिच्या घरची परिस्थिती बेताची असून गावी तिच्या दोन लहान बहिण व आई राहते. या वृत्ताने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुस्तके तशीच राहिली
उत्तरप्रदेशच्या खोजातपूर गावात राहणारी वर्षा गावी अकरावीत अनुउत्तीर्ण झाली होती. याठिकाणी तिच्या अभ्यासासाठी नातेवाईकांनी पुस्तके आणली होती. खासगी शिकवणी घेणाऱ्या या नातेवाईकांकडे तिचे शिक्षण सुरु होते. मात्र या परिस्थितीशी जुळवून घेताना तिला अडचणी येत होत्या. या मानसिक विवंचनेतूनच तिने जीवन संपवल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.