• Sat. Sep 21st, 2024
तरुणी कॉलेजला निघाली; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

सोलापूर: सोलापूर विद्यापीठासमोर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. रिक्षामधून कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीचा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जागीच मृत्यू झाला आहे. रिक्षाला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (१७) ही अकरावीतील विद्यार्थिनी अपघातात ठार झाली आहे.
ICUमध्ये आग, संपूर्ण रुग्णालय संकटात; आगीचं कारण समजताच डॉक्टरांनी कपाळावर हात मारला
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील गांधी नाथा महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात भाग्यश्री शिक्षण घेत होती. भाग्यश्रीच्या मृत्यूमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर शहराजवळ असलेल्या कोंडी गावातून सोलापूर शहरात कॉलेजसाठी निघालेल्या रिक्षाला सोलापूर विद्यापीठासमोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. भाग्यश्री कांबळे हिने राष्ट्रीय महामार्गावर तडफडत प्राण सोडले.

तुम्ही तयारीला लागा, मुंबईत आमरण उपोषण करणार ; जरांगेंनी नव्या लढाईला हाक दिली

रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (१९) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (१४) हा आठवीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. भाग्यश्रीचे वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सोलापूर शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed