• Sat. Sep 21st, 2024
लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढविणार? अजित पवार म्हणाले…..

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही; त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल,’ असे सांगतानाच ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे, तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढतील’, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केले.

‘सध्या देशासह जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता आहे. महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी आम्ही मोदी यांच्या भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे,’ असे पवार म्हणाले.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! उद्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक, काही लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक शुक्रवारी मुंबईत झाली. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आदेश दिले. ‘सत्ताधारी महायुतीत अंतर पडेल, असे कोणीही वागता कामा नये. ऐक्य अबाधित राखण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करू नये. आमचा पक्ष लोकसभेच्या किती जागा लढणार याची माहिती योग्यवेळी देऊ. पण मागच्या तुलनेत जास्त जागा निवडून आणण्याचा मानस आहे,’ असे पवार यांनी सांगितले.

नागपूरच्या रेशीमबाग मुख्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आपण गेला नाहीत. यामुळे त्या कार्यक्रमावर नाराज होतात काय, असा प्रश्न विचारला असता, ‘मुळात असे निमंत्रण आम्हाला आलेले नव्हते. यामुळे नाहक या मुद्द्यावर वावड्या उठविण्याचे कारण नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘आमच्यात मॅच फिक्सिंग नाही’

‘भारतीय संस्कृती, संस्काराचा भाग म्हणून पवार कुटुंबीय घरगुती कारणामुळे कौटुंबिक भेटी घेतात. त्याला राजकीय लेबल नको. आमच्यात कुठेही मॅच फिक्सिंग नाही. आमच्यासोबत जे आले आहेत, त्यांना फसवणार नाही. माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो’, असे अजित पवार म्हणाले.

हे धंदे बंद करा, कसं काय बोलायचं ते आम्हाला कळतं, बोलायला उभा राहिलेल्या जयंतरावांना अजित दादांनी सुनावलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed