• Sat. Sep 21st, 2024
दादरमध्ये दुकान चाललं नाही म्हणून चितळे बंधू पुण्याला गेले अन् इतिहास घडला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बाकरवडी, आंबा बर्फी यांनी मराठीच नाही तर अमराठी जिभांना मोहवलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांनी पहिले दुकान दादरमध्ये सुरू केले होते. ते दुकान भागीदारीत सुरू होते. मात्र तिथे दुकान चालू शकले नाही म्हणून ही भागीदारी पुढे गेली नाही आणि पुण्यात १९५० मध्ये दुकान सुरू झाले. अन्यथा चितळे बंधू पुण्याचे नाही तर मुंबईचे म्हणून ओळखले गेले असते… अशी मुंबईकरांशी नाळ जोडत चितळे बंधू मिठाईवालेचे केदार चितळे यांनी माहिती दिली आणि विलेपार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रांगणात टाळ्यांचा कडकडाट झाला.

बाकरवडी आणि आंबा बर्फीने भुरळ घातलेल्या चितळेंच्या दुग्ध व्यवसायापासून सुरू झालेल्या प्रवासाचा आढावा लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथासंग्रहालयाच्या माध्यमातून आयोजित लोकमान्य गप्पांमध्ये घेण्यात आला. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी चितळे डेअरीचे गिरीश चितळे आणि केदार चितळे यांना डेअरी व्यवसाय ते विक्री, तसेच घरामध्ये कोणते पदार्थ आवडतात, सणांना दुकानातून पदार्थ आणले जातात की घरी केले जातात असे विविध प्रश्न विचारत या गप्पा रंगवल्या. या गप्पांमध्ये गिरीश चितळे यांनी दुग्ध व्यवसायाची शुद्धता टिकवण्यासाठी होणाऱ्या प्रयत्नांचीही यावेळी माहिती दिली. उपस्थित रसिकांनी दुधामध्ये होणाऱ्या भेसळीबद्दलही यावेळी खुलेपणाने प्रश्न विचारले.

पुण्यातील चितळेंची बाकरवडी आता मुंबईत ही मिळणार

चितळेंच्या फॅक्टरीमध्ये तयार होणारा पदार्थ आधी घरी येतो, त्यावर टीका, टीप्पणी होते, कौतुक होते, त्यानुसार त्यात बदल होतात आणि मग तो पदार्थ विक्रीयोग्य करून दुकानात जातो असे चितळे बंधूंतर्फे सांगण्यात आले. भिलवडीला चितळेंच्या डेअरीचा सुरू झालेला प्रवास सांगताना साताऱ्यात दूध विकण्याची पद्धत नव्हती मात्र आजोबा भास्कर गणेश चितळे यांनी ही पद्धत सुरू केली याचीही आठवण त्यांनी जागवली. त्यानंतर कृष्णाकाठी सुयोग्य जागा पाहून डेअरीचा भिलवडीला सुरू झालेला व्यवसाय, पुण्यात आगमन, विपणन, पदार्थ वाढल्यावर यांत्रिकीकरणावर दिलेला भर, ९० च्या दशकापासून बाकरवडी यांत्रिक पद्धतीने बनवण्यासाठी केलेले संशोधन असा व्यापक पट या दीड तासांच्या गप्पांमध्ये मांडण्यात आला.

‘चितळे’ दुपारीही सुरू…

पारंपरिक पदार्थांची चव राखण्यासाठी काय दक्षता घेतली जाते याबद्दही यावेळी सांगण्यात आले. खवा बननण्याचे पहिले मशिन चितळेंकडे होते. एकाच पद्धतीने खवा बनवून मग तो खवा पुण्यात आणून त्याची आंबा बर्फी होते. पूर्वी चितळेंकडे दिवसाला २०० किलो बाकरवडी बनवली जायची मात्र आता प्रति तास २०० किलो बाकरवडी केली जाते ते यांत्रिकीकरणामुळे शक्य झाल्याचेही चितळे यांनी सांगितले. काही पारंपरिक पदार्थांना भावनिक स्पर्श हवा त्यामुळे ते पदार्थ मात्र यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून करणे टाळतो याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

स्थानिक ग्राहकांचा पाठिंबा

आमची अन्यत्र शाखा नाही, दुपारी १ ते ४ बंद, चितळेंच्या मिठाईचे दर ते सोशल मीडियावर चितळे बंधूंच्या दुकानाबद्दल येणारे मीम्स अशा विविध विषयांवर गाडगीळ यांनी चितळेंना प्रश्न विचारले आणि त्यांनीही तितक्याच खुलेपणाने याची उत्तरे दिली. यावेळी गिरीश चितळे यांनी मराठी उद्योजकांनी ब्रॅण्ड आयडेंटिटीचा तिटकारा सोडला पाहिजे असे आवर्जून सांगितले. चितळेंनी फ्रँचाइजी सुरू केल्यानंतर स्थानिक ग्राहकवर्गाने त्याला पाठिंबा दिला असेही निरीक्षण त्यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed