• Mon. Nov 25th, 2024

    शेतकरी प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई, पवारांचे शिलेदार सज्ज, जनआक्रोश मोर्चातून सरकारला घेरणार

    शेतकरी प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई, पवारांचे शिलेदार सज्ज, जनआक्रोश मोर्चातून सरकारला घेरणार

    पुणे : संसदेत अधिवेशन काळात सत्ताधाऱ्यांनी विविध कारणांवरून जवळपास १४३ खासदारांचं निलंबन केलंय. त्यात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. “लाखोंचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती दोन्ही खासदारांकडून देण्यात आली आहे. २७ ते ३० डिसेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

    कांद्यावरील निर्यात बंदी, दूधाचे पडलेले दर यामुळे शेतकरी अडचणीत आल्यामुळे संसदेत या विषयांवर चर्चा व्हावी अशी आम्ही मागणी केली असता आम्हा दोघांनाही निलंबित करण्यात आले. त्यानंतर रस्त्यावरील लढाई लढण्याचा आम्ही निर्धार केला, असे सांगताना खासदार डॉ. कोल्हे यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे रणशिंग फुंकले.

    VIDEO : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट, नाना पाटेकर म्हणाले, मला खूप आनंद होईल जर…
    या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चा प्रारंभ २७ तारखेला शिवनेरी (जुन्नर) येथे होणार असून ओतूर, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, राजगुरुनगर, चाकण (मशाल मोर्चा), केंदूर पहिला मुक्काम होईल. दुसऱ्या दिवशी (दि. २८ रोजी) केंदूर येथून शिक्रापूर, न्हावरा, मांडवगण, निर्वि मार्गे दौंड येथे मुक्कामी जाईल. दि. २९ डिसेंबरला दौंड येथून इंदापूर मार्गे बारामती येथे जाणार असून बारामती शहरात मशाल मोर्चा काढून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश व्यक्त केला जाईल.

    अखेरच्या दिवशी (दि. ३० डिसेंबर) बारामती येथून उरळीकांचन, कुंजीरवाडी, हडपसर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे दुपारी ३.०० वाजता सांगता सभा होणार असून या सांगता सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed