• Sat. Sep 21st, 2024

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – पर्यटन मंत्री गिरीश महाजन 

ByMH LIVE NEWS

Dec 22, 2023
‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – पर्यटन मंत्री गिरीश महाजन 

मुंबई, दि. २२ : मुंबईत  २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी  दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, ड्रीम स्पोर्ट्सचे सिध्देश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, देशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये व्यावसायिक, भागधारक, शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढविण्यात यावा.

मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्याने महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी लागणा-या विविध परवानग्या, महोत्सवाचे नियोजन, वेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे. मुंबईचे डबेवाले, मुंबईची सांस्कृतिक कोळी बांधव, मुंबईचे शेअर मार्केट, मुंबईचे हॉलीवुड स्टार, मुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवल मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयाने काम करावे, असेही आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed