• Sat. Sep 21st, 2024

मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

ByMH LIVE NEWS

Dec 22, 2023
मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २२ :  मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे  असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे  बोलत होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवीण महाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र पवार, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिनकर तावडे, दीपक पारडीवाला, काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण- २०२४ कार्यक्रमांतर्गत मतदार ओळखपत्रातील त्रृटी दुर करणे,  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट तसेच  अंधुक  छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून  योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासोबत एक Booth Level Agent (BLA) राजकीय पक्षाने नियुक्त करुन सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केली.

मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत राज्यामध्ये दि.27 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानंतर दि.27 ऑक्टोंबर, 2023 ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार दि.21डिसेंबर, 2023 पर्यत मतदार यादीमध्ये 8 लाख 50हजार 816 एवढी निव्वळ नाव नोंदणी झालेली आहे. यामुळे दि. 21 डिसेंबर,2023 रोजी राज्याच्या मतदार यादीतील एकुण मतदारांची संख्या 9 कोटी 16 लाख 83 हजार 79 एवढी झालेली आहे. यामध्ये महिला मतदार ४ कोटी ३९ लाख ३८ हजार ३१६ ,पुरुष मतदार ४ कोटी ७७ लाख ३९ हजार ३८८ इतके असून तृतीय पंथी ५३७५ इतके मतदारांची नोंद झाली आहे. मतदार नोंदणी बाबत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.मतदार संघ निहाय असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असेही असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले

पदवीधर विधानपरिषद मतदार नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी एकूण 61 हजार 390, कोकणसाठी 85 हजार 667 इतकी नोंदणी झाली आहे. तसेच दि.21 डिसेंबर पर्यत मुंबईसाठी 29 हजार 446 व कोकणसाठी 1 लाख 8हजार 76 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक विधानपरिषद मतदारांच्या नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी 11 हजार 155 व नाशिकसाठी 53 हजार 518 एवढी नोंदणी झाली आहे. दि.21 डिसेंबर पर्यत मुंबई साठी 2हजार 820 व नाशिकसाठी 11 हजार 268 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निवडणूकीमध्ये उमेदवाराच्या नामनिर्देशनाच्या दिनांकाच्या 10 दिवस अगोदर पर्यत सुरु असते, अशीही  माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली.

००००

संध्या गरवारे/विसंअ                             

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed