पुणे, दि.२१: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.
पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत. ही आजच्या पिढीसाठी चांगली बाब आहे. येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असून २४ डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल, अशा शब्दात या भव्य आयोजनाबद्दल श्री. पाटील यांनी कौतुक केले.
या पुस्तक महोत्सवामुळे चार विश्वविक्रम मोडण्यात आले आहे हे पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक वाचनाविषयी मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यमहोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होत आहेत.
यावेळी श्री. पाटील यांनी विविध प्रकाशनाच्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून त्यांनी महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमांची माहिती घेतली.
0000