अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त अन्नपदार्थाबाबत धडक मोहीम हाती घेवून जनतेस दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी संपूर्ण जिल्ह्यात शोध मोहीम सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून रविवार (१७ डिसेंबर ) रोजी अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने मोरे मळा, लक्ष्मण टाऊनशिप, अंबड लिंक रोड, सिडको येथे संध्याकाळी ६.३० वाजता अशोक जीतलाल यादव यांच्या मे. तिस्ता क्रोप केअर प्रा.लि या कारखान्याची तपासणी केली असता तेथे रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा वापर करुन पनीर अन्नपदार्थ बनवित असल्याचे आढळून आले.
त्यामुळे तेथून पनीर, रिफाईन्ड पामोलिन ऑईल व मिक्स मिल्क या अन्नपदार्थाचे नमुने घेवून पनीरचा ४६ हजार ५६० रुपये किमतीचा १९४ किलो साठा, रिफाईन्ड पोमोलिन ऑईलचा १४ हजार ९६० रुपये किमतीचा ८८ किलो साठा व मिक्स मिल्कचा ४४ हजार ९४० रुपये किमतीचा १ हजार ४९८ लिटर साठा असा एकूण १ लाख ६ हजार ४६० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
रिफाईन्ड पामोलिन ऑईलचा साठा अन्न व्यावसायिकाच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. जप्त केलेले चारही अन्ननमुने विश्लेषणासाठी अन्न विश्लेषकांकडे पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालाच्या अनुषंगे अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती सह आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनाला अहवाल मिळाल्यानंतर याप्रकरणी नेमकी कोणती कारवाई केली जाणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे. एफडीएच्या कारवाईमुळं अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News