• Fri. Nov 29th, 2024

    राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक उर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

    ByMH LIVE NEWS

    Dec 18, 2023
    राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक उर्जा मिळाली- विद्यार्थ्यांच्या भावना

    नागपूर, दि. १८ : – राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास वर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

    या चर्चासत्रप्रसंगी विधान मंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते.

    राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गाने काय दिले, या विषयावरील  चर्चासत्रात मुंबई विद्यापीठाची सौम्या राजेश, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणेची श्रध्दा माटल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरची आशिया जमादार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचा सिद्धार्थ कढरे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जळगावची दिपाली शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचा शुभम गुरुम, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीची धनश्री म्हाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचा राजशेखर रगटे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबईची संस्कृती पटनाईक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची अरुंधती सरोदे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची लिंटा टॉमसन आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची करिष्मा कावळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

    राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गामुळे लोकशाहीच्या या मंदिरात प्रत्यक्ष बसण्याची संधी  मिळाली असे स्पष्ट करून अभ्यास वर्गात झालेल्या मार्गदर्शनामुळे संसदीय लोकशाहीची संकल्पना आत्मसात करता आली.  विधिमंडळाची कार्यप्रणाली, संसदीय समित्यांची रचना व कार्य, विविध आयुधे या माहितीसह विधिमंडळाचे कामकाज पाहता आले, या अभ्यास वर्गात सहभागी विद्यार्थांसाठी आनंदाचा क्षण असल्याची चर्चा झाली.

    विधिमंडळाचे  कामकाज पाहताना लोकशाहीत संवाद हा महत्वाचा भाग असल्याची जाणीव झाली.  संवादातून प्रश्न सोडवले जातात, यासाठी राज्याच्या विकासासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून विधिमंडळ सदस्य वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात हेही पाहता व अनुभवता आले.

    राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होणे हा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय क्षण आहे. या  अभ्यास वर्गातील झालेल्या मार्गदर्शनामुळे सकारात्मक दृष्टी  निर्माण  होऊन हा अभ्यासवर्ग प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा अनुभव देऊन गेला अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. या चर्चासत्रानंतर राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप झाला.

    ००००

    एकनाथ पोवार/वि.स.अ.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed