• Tue. Nov 26th, 2024

    भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल -केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी

    ByMH LIVE NEWS

    Dec 16, 2023
    भारताच्या विकास प्रक्रियेत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्वाची ठरेल -केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी

    पुणे, दि. १६ : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘विकसित भारत संकल्प यात्रा’  भारताच्या विकास प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी  केले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील विकसित भारत यात्रेला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करून अनेक लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी असताना श्री. चौधरी बोलत होते.

    यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके, अल्केश उत्तम आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. चौधरी म्हणाले की, देशातील सर्वसामान्य जनतेचा विकास झाला तरच भारत जगात विकसित राष्ट्र म्हणून उदयाला येईल. सन २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे  प्रधानमंत्री मोदी यांचे उद्दिष्ट असून जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्ती सुविधा संपन्न होणार नाही तोपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. हा उद्देश साध्य करण्यासाठी विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना स्थानिक आणि गाव पातळीपर्यंत पोहचविण्यात येत आहेत.

    जे नागरिक योजनांपासून वंचित आहेत, ज्यांना आतापर्यंत योजनांचा लाभ मिळाला नाही अशा गरजू नागरिकांना यात्रेच्या माध्यमातून जागेवरच योजनांचा थेट लाभ दिला जात आहे. गेल्या ९ वर्षात देशभरातील गरिबांच्या खात्यात विविध योजनांच्या माध्यमातून  किमान ३३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत  जमा करण्यात आली आहे, असे सांगून महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होऊन केंद्राच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    श्री. चव्हाण म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील नागरिकांना पोहचविण्याच्यादृष्टिने सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आणि नागरिकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. यात्रेच्या माध्यमातून वंचित घटकातील नागरिकांना योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांना थेट लाभ दिला जात आहे. ही यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

    कार्यक्रमात मंत्री श्री. चौधरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत कार्ड, बचत गटांना खेळते भांडवलसाठी आर्थिक मदतीचे धनादेश, जल जीवन मिशन चे कार्यारंभ आदेश इत्यादी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed