• Tue. Jun 16th, 2026

    लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

    ByMH LIVE NEWS

    Dec 15, 2023
    लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

    अमरावती, दि.१५ : लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

    लोणार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीद्वारे आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य एस सान्याल, दिपक ठाकरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, उपसंचालक (नियोजन) हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

    श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या पर्यटनस्थळाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

    सरोवरातील पाण्याचा उपयोग होण्यासाठी पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ भुजल सर्वेक्षण विभाग व निरीच्या तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात यावी, अशा सूचना समितीने संबंधित यंत्रणांना केल्या. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या 15 मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे पुरातत्व विभागाने करावयाची असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. लोणार सरोवर परिसरातील गायमुख मंदिरस्थळी भेट देणाऱ्या पर्यटक व नागरिकांकडून आंघोळीसाठी शॅम्पू, डिर्टजंन्ट व साबून वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे लोणार सरोवरातील पाणी दुषित होत असून त्यातील जैवविविधतेवर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्याठिकाणी आंघोळीसाठी प्रतिबंध करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाला विकास आराखडा समितीने दिल्या.

    लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या माहितीचा अहवाल नियमितपणे समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी वन विभागाला दिल्या. सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून उमद्या संशोधकांकडून संशोधनाला चालना मिळेल. लोणार सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’ चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असेही डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed