• Sat. Sep 21st, 2024

सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती

ByMH LIVE NEWS

Dec 15, 2023
सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती

नवी दिल्ली, दि. १५: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सरस फूड फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली आहे. दिल्लीकर खवय्ये सावजी मटण, चिकन, मांडा, झुणका-भाकर, भरीत भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी, वडापाव, मिसळपाव आणि पुरण पोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहे.

कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गावर एक डिसेंबर २०२३ पासून सरस फूड फेस्टिव्हल भरविण्यात आले आहे. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या च्या ‘राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान’ या प्रमुख कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला उद्योजक आणि महिला बचत गट महोत्सवात सहभागी झाले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी एमओआरडीचा उपक्रम आहे. या फेस्टिव्हलमध्ये 21 राज्यांतील 150 महिला उद्योजिका आणि महिला स्वयं-सहायता व बचत गट सहभागी झाले असून एकूण 30 स्टॉल आहेत. या महिलांनी आपापल्या राज्यातील विविध प्रकारचे पारंपारिक खाद्यपदार्थ बनवून खवय्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील तीन स्टॉल्स आहेत. यामध्ये नाशिक, जळगाव व बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांचा समावेश आहे.

नाशिक येथील निफाड तालुक्यातील ‘सर्वज्ञ’ महिला बचत गटाच्या मांडा, खांडा, धिरडा, झुणका भाकर, भरीत-भाकर, तर जळगाव येथील गंगासागर महिला बचत गट यांनी मिसळ पाव, वडापाव, पुरण पोळी, थालीपीठ, भजी, महाराष्ट्रीयन थाळी, भरडधान्यांची भाकरी सह पिठलं, शेव भाजीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रुक्मिणी महिला बचत गट यांच्या स्टॉलवर सावजी मटण, चिकन, पुरण पोळी, ज्वारी, बाजरी व तांदळाच्या भाकरीसह मांसाहारी पदार्थ खाणा-या खवय्यांची गर्दी दिसत आहे.

राजधानीत प्रथमच स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने नाशिकच्या वंदना मांडरे-पद्मावती व छाया झंवझाळ खूपच आनंदी आहेत. खवय्यांनी पारंपारिक पदार्थांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

जळगावच्या वैशाली बारी यांनी घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ देशाच्या राजधानीतील खवय्यांसमोर तयार करून त्यांना खाऊ घालून, त्यांच्याकडून मिळालेली दाद, मनाला सुखवून जाते अशी प्रतिक्रिया दिली.

परळी मधील विमल जाधव यांनी, या फेस्टिवलमुळे आम्हाला पाककौशल्य दाखवण्याची आणि राज्याची खाद्य संस्कृतीची देशातील लोकांना ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed