• Sat. Sep 21st, 2024

बदलापूर स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने ५ महिलांवर गुन्हा दाखल, पण प्रश्न कधी सुटणार?

बदलापूर स्थानकात लोकलचा दरवाजा बंद केल्याने ५ महिलांवर गुन्हा दाखल, पण प्रश्न कधी सुटणार?

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जतहून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्याचा दरवाजा बंद करणे पाच महिला रेल्वे प्रवाशांना चांगलेच भोवले आहे. हा प्रकार करणाऱ्या पाचही महिला प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी शोधून काढत त्यांच्याविरोधात रेल्वे अधिनियमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात किमान असे प्रकार पुन्हा घडू नयेत, तसेच इतर स्थानकांवरील प्रवाशांना रेल्वेत चढण्यापासून रोखणाऱ्यांना रेल्वेने हा गुन्हा दाखल करत इशारा दिला आहे.

अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि त्यापुढील भागांत वाशांची संख्या वाढत असताना कल्याण ते कर्जत मार्गावर मात्र रेल्वेच्या फेऱ्या, रेल्वेतील डब्यांची संख्या मात्र वाढताना दिसत नाही. महिला प्रवाशांच्या संख्येतही कमालीची भर पडली असली तरी महिलांच्या डब्यांची संख्या मात्र तेवढीच आहे. रेल्वे संघटनांकडून मागणी करूनही सकाळी गर्दीच्या वेळेत या मार्गावर महिला विशेष लोकलसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे गेल्या काही काळात रेल्वे प्रवाशांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे.

तीन दिवसांपूर्वी बदलापूर स्थानकावर कर्जतहून आलेली ७ वाजून ५१ मिनिटांच्या लोकलमधील पहिल्या वर्गाच्या डब्यातील काही महिलांनी दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे बदलापूर स्थानकावरील महिलांना डब्यात शिरता येत नसल्याने एकच वाद आणि गोंधळ उडाला होता. यावर अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत लोकलचे दरवाजे उघडून महिला प्रवाशांना प्रवेश दिला होता, मात्र या प्रकरणात रेल्वे महिला पोलिसांनी लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या शेलू, कर्जत येथील पाचही महिला रेल्वे प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्यावर रेल्वेच्या अधिनियमानुसार कल्याण आरपीएफमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली आहे.

रेल्वे प्रकल्पासाठी सक्तीचं भूसंपादन थांबवा, ओमराजे निंबाळकर संसदेत आक्रमक

– रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणावर भर मात्र रेल्वेच्या वाढीव फेऱ्यांबाबत लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

– महिला प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुऱ्या डब्यांमुळे संघर्षाच्या घटनांत वाढ

– यार्डातून सुटणाऱ्या लोकल तसेट रिटर्न बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधातही वादाच्या घटना

– प्रवाशांमध्ये वारंवार होणाऱ्या वादाचा रेल्वे सेवेवर परिणाम, रेल्वे पोलिसांची डोकेदुखी वाढली

सकाळच्या वेळेस मोठ्या काळाच्या अंतराने या मार्गावर लोकल असून त्याही उशिरा धावत असल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत असते. प्रवाशांकडून कोट्यवधींचे उत्पन्न घेणाऱ्या रेल्वेच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार वाढत असून, जे वेळेचे नियोजन पश्चिम रेल्वेला जमते, ते मध्य रेल्वेला का जमत नाही, हा प्रश्न आहे. – मनोज मिस्त्री, उपाध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था

तुमच्या जमिनीत खजिना पुरलाय, फसवून ४ वर्षात ११ जणांची हत्या, एक चूक अन् सिरियल किलरला अटक
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed