• Sun. Sep 22nd, 2024
आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग काढा, मराठ्यांना का फसवता? : जितेंद्र आव्हाड

नागपूर : मराठा समाजास आरक्षण द्यायचे तर, मार्ग काढा. घटनेनुसार आरक्षण देण्याची सरकारची स्थिती नाही. कुठल्या पद्धतीने मार्ग काढणार हे सांगा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरल्यानंतर तुम्ही समाजास का फसवता? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला.

शांततेने सुरू असलेले आंदोलन चिघळवले. यातून दुष्ट हेतूने महाराष्ट्र पेटवला. महाराष्ट्र अशांत आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत ही धगधग अशीच सुरू ठेवायची आहे का, आतापर्यंत दोन धर्मांना आमने-सामने उभे केले. हिंदू-मुस्लिम असा वाद पेटवला. आता ओबीसी-मराठा समाजात संघर्ष निर्माण केला गेला. ओबीसीतून मराठा समाजास आरक्षण देऊ शकता का, हे शक्य नाही. जरांगे यांना सांगायचे आरक्षण देतो, ओबीसींना सांगायचे एक टक्काही कमी करणार नाही. यातून ओबीसी समाजास अस्वस्थ केले. राज्यकर्त्यांनी लेचीपेची भूमिका घेतल्याने महाराष्ट्राची स्थिती उद्भवली आहे, असा आरोप करून आव्हाड म्हणाले, शांत, स्थिर महाराष्ट्र अशांत केला जात आहे. उद्या राज्य पेटल्यास कितीही बंब आणले तरी, विझणार नाही.

तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या काळात जातनिहाय गणनेचा एकमताने ठराव संमत झाला. विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. का होत नाही गणना, यातून सर्व प्रश्न सुटतील. मात्र, प्रश्नच सोडवायचे नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुकीच्या तोंडावरच जातीचे राजकारण का? २०१४ साली राणे आयोग, २०१९ साली मोर्चे आणि आता आरक्षणासाठी रस्त्यावरील लढा, काही नेत्यांना निवडणुकीच्या तोंडावर जातीच्या उलट्या होतात. जरांगे पाटील कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता हा बेदरकार असतो. मात्र, त्यांच्यासमोर एक प्रगल्भ नेतृत्व आहे. अशा नेतृत्वाच्या मुखातून अंगार बाहेर पडावा हे अपेक्षित नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेली भूमिका पटणारी नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed