• Sat. Sep 21st, 2024

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार

केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार

नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत टीका शरद पवार यांनी केली. कांदा हे लहान व जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहेत, त्यांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, ही भावना नाही. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ही जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ते सोमवारी चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या रास्तारोकोमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शरद पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. हा एक निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

आम्हाला रस्त्यावर बसायची हौस नाही, आम्हाला रास्तारोको करुन लोकांना त्रास द्यायचा नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. कांदा निर्यातबंदीनंतर इतके दिवस राज्यातील सत्ताधारी त्याबद्दल बोलत नव्हते. पण आज चांदवडमध्ये आंदोलन होणार हे कळाल्यानंतर आज सकाळपासून सत्ताधारी नेते आम्ही केंद्राशी चर्चा करणार, असे सांगू लागले आहेत. सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणं आखणारे नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

सरकार कांदा निर्यातबंदी उठविणार? फडणवीस यांनी घेतली पीयूष गोयल यांची भेट,आज दिल्लीत बैठक

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात कांद्याचे दर कोसळले असून कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यातील सर्वात अनुभवी आणि शेतीच्या अर्थकारणाची सखोल जाण असलेला नेता म्हणून ओळख असलेले शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. काहीवेळापूर्वीच शरद पवार हे मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको सुरु असलेल्या चांदवडमधील आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या येण्याने येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच थेट रस्त्यावरील लढाईत उतरले आहे. कांद्याचा मुद्दा हा राज्यातील शेतकरी आणि जनतेच्यादृष्टीने महत्त्वाचा असल्याने शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीविरोधातील लढाईत घेतलेला सहभाग अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चा काढला. हा मोर्चा आता चौफुली येथे पोहोचला असून याठिकाणी शरद पवार मोर्चेकऱ्यांना येऊन मिळाले. नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने आंदोलनाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे. गाडीतून उतरल्यानंतर शरद पवार शेतकऱ्यांच्या याच गर्दीतून वाट काढत व्यासपीठापर्यंत गेले. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीविरोधातील लढाईत आम्हाला पाठिंबा द्या, अशी विनंती शरद पवार यांना केली.

काठी नका मारू, थेट गोळीच घाला साहेब; संतप्त शेतकऱ्यांची मागणी, कांदा निर्यातबंदीला जोरदार विरोध

मात्र, या आंदोलनाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या गटाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठे बळ मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गट हा सत्तेत सहभागी असल्यामुळे केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीविरोधात या गटातील नेते सावधपणे बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी शरद पवार मात्र कांदा निर्यातबंदीविरोधातील रस्त्यावरच्या लढाईत उतरले आहेत. शरद पवार यांना राजकारणाचा आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव असल्यामळे ते मोर्चात सहभागी झाल्याने कांदा उत्पादकांचा आवाज दिल्लीत केंद्र सरकारपर्यंत पोहोचेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. शरद पवार चांदवडच्या दिशेने येत असताना जागोजागी शेतकरी त्यांना भेटून निवेदनं देत होते. शरद पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि कांदा निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यायला लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed