• Sun. Sep 22nd, 2024

विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १५ हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग– पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

ByMH LIVE NEWS

Dec 9, 2023
विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत १५ हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग– पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

  • प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित
  • जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील निवडक जिल्ह्यातील लाभार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याचा सांगली जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम नांद्रे येथे झाला. जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे होते. तसेच, जिल्ह्यातील अस्वलवाडी (ता. शिराळा), बलवडी (खा.) (ता. खानापूर), नांद्रे (ता. मिरज), सिद्धनाथ (ता. जत), कान्हरवाडी (ता. कडेगाव), इरली (ता. कवठेमहांकाळ), रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा), माडगुळे (ता. आटपाडी), हजारवाडी (ता. पलूस) आणि वडगाव (ता. तासगाव) या ग्रामपंचायतींमध्येही प्रधानमंत्री यांचे संबोधन दूरदृष्यप्रणालीद्वारे प्रसारित करण्यात आले. या कार्यक्रमास लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विकसित भारत संकल्प यात्रेला देशभरात मिळत असलेल्या अद्भूत व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल प्रशंसा व्यक्त करत दूरदृष्य प्रणालीद्वारे केलेल्या मार्गदर्शनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य, पोषण यासह अन्य बाबींसाठी केंद्र शासनाच्या अनेकविध कल्याणकारी योजनांतून लाभ देण्यात येत आहे. हा लाभ घेण्यासाठी या यात्रेमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जावे लागत नाही. या माध्यमातून जनतेमध्ये विश्वास निर्माण होत आहे. त्यांना जीवन जगण्यासाठी नवे बळ, नवी उमेद मिळत आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी विकसित भारताकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा देशभरातील आढावा व आगामी संकल्प व्यक्त केला.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात 15 दिवस सुरू असून, 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील 697 ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. आतापर्यंत 216 ग्रामपंचायतींमध्ये 10 व्हॅनच्या माध्यमातून 15 हजारहून अधिक लाभार्थींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत व वंचितांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये घरकुल,  उज्ज्वला गॅस, मुद्रा, किसान सन्मान, सुरक्षित मातृत्त्व, मातृवंदना, सुकन्या समृद्धी अशा केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत 3 तास ही व्हॅन थांबेल. योजनांची माहिती उपस्थितांना देईल. त्यासाठी गरजू पात्र लाभार्थींनी नोंदणी करावी. योजनांचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवावा, तसेच इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी सुरू केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमाबद्दल त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देत ऋणनिर्देश व्यक्त केले.

नांद्रे येथील मुख्य कार्यक्रमास सरपंचा पूजा भोरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर  पोलीस अधीक्षक रितू खोखर, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, मिरजच्या गटविकास अधिकारी संध्या जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार अर्चना पाटील, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी श्री. सय्यद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, निशिकांत भोसले – पाटील, दीपक शिंदे म्हैसाळकर, स्वाती शिंदे, शेखर इनामदार, उपसरपंच अमित पाटील, यांच्यासह विविध यंत्रणाचे वरिष्ठ अधिकारी व लाभार्थी, ग्रामस्थ, महिला आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित लाभार्थींना दिली. लाभार्थींनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमानंतर प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थींना लाभ वाटप करण्यात आले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed