• Mon. Nov 25th, 2024
    ऐकावे ते नवलचं…! शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म

    अहमदनगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे. पांढऱ्या शुभ्र शेळीने पांढरीच सुदृढ पिल्ले जन्माला घातली आहेत. साधारणपणे ७५ टक्के शेळ्यांना एक ते दोन करडे होतात. चार टक्के शेळ्या तीन करडे देतात. त्यापेक्षा जास्त करडे अपवादानेच दिली जातात. गोफणे यांच्या कळपातील शेळी अशीच अपवाद ठरली आहे.
    मुरबे-सातपाटी जेट्टीचा मार्ग मोकळा; जेट्टी उभारण्यास अखेर उच्च न्यायालयाची परवानगी
    महात्मा फुले कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित शेळी सुधार प्रकल्पाद्वारे संगमनेरी शेळ्यांचे जतन, संवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी जातिवंत संगमनेरी बोकड शेळी पालकांना पैदासीसाठी दिले जातात. याअंतर्गत संगमनेर केंद्रातील हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या संगमनेरी शेळ्यांच्या कळपातील दोन शेळ्यांना प्रत्येकी चार करडे आणि एका शेळीने पाच करडे देण्याचा विक्रम केला आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. कुलगुरु डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाने भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सहाय्याने नामशेष होत असलेल्या संगमनेरी जातीच्या शेळ्यांची संख्या तीन हजारांवरून ५० हजारपर्यंत नेण्यात यश मिळविले आहे.

    हा प्रकल्प कार्यक्षमरित्या राबविण्यासाठी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभागप्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. असे संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले. या करडांची शास्त्रोक्त पद्धतीने जोपासना आणि संगोपनसंबंधी मार्गदर्शन संगमनेर केंद्रातील प्रक्षेत्र गणक प्रवीण फटांगरे करत आहेत. संगमनेरी शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी उपयोगी ठरते. संगमनेर हे या जातीचे मुळ स्थान असल्याने तिला संगमनेरी हे नाव पडले. याशिवाय शेजारील पुणे जिल्ह्याच्या काही भागातही या जातीच्या शेळ्या आहेत.

    इकबाल मिर्चीसोबत संबंध, ईडीची कारवाई, तरीही पटेल पंगतीत चालतात; पटोलेंची फडणवीसांवर टीका

    या शेळीची शिंगे पातळ, टोकदार, तसेच मागे वळलेली आणि वरच्या दिशेने असतात. तर काही शेळ्यांना शिंगेच नसतात. पांढऱ्या आणि तपकीरी अशा दोन रंगात ही शेळी आढळतात. ही शेळी अर्धा ते दीड लिटरपर्यंत दूध देते. साधारणपणे १८० दिवस ही शेळी दूध देते. दोन वेतातील अंतर ३३३ दिवसांचे असते. या जातीच्या शेळीच्या मादीचे वजन ३२ किलोपर्यंत तर नराचे (बोकड) वजन ३९ किलोपर्यंत असते. त्यामुळे दूध आणि मांस या दोन्हीसाठी या शेळीला शेतकरी पसंती देतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed