• Mon. Nov 25th, 2024
    मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप… असं जरांगे कोणाला म्हणाले?

    नांदेड : ‘मेरे नाद में मत लग, एक भाकर खाकर झोप..मै पिसळा तो मागे लागतो.. तू गप्प मै गप्प..’ अशा तोडक्या मोडक्या हिंदीत मनोज जरांगेंनी ओबीसी नेते छगन भुजबळांचं नाव न घेता कडाडून टीका केली. नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या चार सभा पार पडल्या. तत्पूर्वी गुरूवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बारड (ता.मुदखेड) येथे पार पडली. शुक्रवारची पहिली सभा नांदेडमधील वाडी पाटी जिजाऊनगर येथे संपन्न झाली. त्या सभेत ते बोलत होते.

    वाडीपाटी परिसरात पार पडलेल्या सभेदरम्यान जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर आपला राग व्यक्त केला. इथून पुढे ते बोलत नसतील तर मी पण बोलणार नाही, जर ते आरक्षणाविरोधात बोलले तर त्यांना सुटी देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. मराठा समाजाने ज्यांना सांभाळले, ते विरोधात गेले. कोण बोर्ड फाडतो, बोर्ड फाडणारा कोणाचा कार्यकर्ता आहे, हे फक्त लक्षात ठेवा. समाजाला आरक्षण मिळाल्यावर त्यांचं बघू. आपलं कोणी वाकडं करू शकणार नाही. मंत्री छगन भुजबळ यांचं नाव न घेता जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला.

    ते म्हणाले, एक येडपट कुऱ्हाडी, लाठ्या, काठ्याची भाषा करतो. जाती जातीत भांडणं लावण्याचा प्रयत्न करतो. वय पाहून शहाणा झालं असेल असं मला वाटलं, मात्र तो येडपट निघाला. मंत्री हा कायद्याचं पालन करणारा असतो. जनतेच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते, हे ते विसरले. मात्र कोणाला घाबरण्याची गरज नाही. आरक्षणासाठी शासनस्तरावर युद्ध पातळीवर काम सुरु आहे. कुणबी मराठ्याचे नोंदी सापडत आहेत. तेव्हा येत्या २४ डिसेंबर पूर्वी मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळणार यात शंका नाही. जाती पेक्षा नेत्यांना मोठं मानू नका असं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. आरक्षणासाठी माझी शेवटच्या श्वासापर्यंत लढाई सुरु राहणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. सभेला हजारोच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

    जरांगे पाटील झाले भावुक

    दरम्यान, भाषण सुरु असताना जरांगे पाटील हे अचानक भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. मी कधी ही भावनिक झालो नाही, पण समाजाने माझ्यावरील प्रेम कमी पडू दिलं नाही. माझा लढा आरक्षणासाठी आहे. जेव्हा आरक्षण मिळेल, तेव्हा माझं जीवन सार्थक होईल. समाजाला विनंती आहे एकजूट तुटू देऊ नका. कोणीही आत्महत्या करू नका उद्रेक करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed