• Sat. Jun 20th, 2026
    विधानपरिषद प्रश्नोत्तरे

    सांगली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

    नागपूर दि.८: सांगली जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानपरिषदेत दिली.

    यासंदर्भातील प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. यावेळी मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले की, सांगली सामान्य रुग्णालयांमध्ये फक्त ४०० खाटांची सुविधा असून सांगली जिल्हा, उत्तर कर्नाटक, कोकण, सांगोला जि.सोलापूर, जयसिंगपूर, शिरोळ, इचलकरंजी जि.कोल्हापूर इत्यादी परिसरातील रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात.त्यामुळे या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.या रुग्णालयासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सीटी स्कॅन मशीन खरेदी करिता अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.सामान्य रुग्णालय, सांगली हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,मिरज या संस्थेशी संलग्नित असल्याने तेथे सर्व तपासण्या करण्यात येत असल्याचेहीमंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

    000

    वर्धेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांचे निलंबन मंत्री मंगल प्रभात लोढा

    नागपूर दि.८ :वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व  जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधान परिषदेत केली.

    यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री उमा खापरे, प्रविण दरेकर, सचिन अहिर आणि प्रविण दटके आदी सदस्यांनी उपस्थित केला होता.

    यावेळी श्री लोढा म्हणाले की,सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, वर्धा यांनी चौकशी समिती गठीत केली होती.गठीत  करण्यात आलेल्या चौकशी समितीने प्रशिक्षणार्थ्यांना  नियमानुसार मंजूर निर्वाह भत्ता व विद्यावेतनाची रक्कम प्रशिक्षणार्थ्यांच्या  बँक खात्यात जमा करणे अपेक्षित असताना सदर प्रशिक्षणार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध असताना सुद्धा रोख रक्कम अदा करण्यात आल्याचे संस्थेतील नोंदीवरून दिसून आले आहे . चौकशी समितीने दिलेल्याअभिप्रायानुसार, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था सेलू जिल्हा वर्धा यांना कारणे दाखवा नोटीस दिनांक २८ नोव्हेंबर,२०२३ रोजी बजावण्यात आली आहे.त्याअनुषंगाने प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सेलू जि.वर्धा यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती.परंतु या उत्तरावर सदस्यांचे समाधान झाले नाही त्यामुळे सेलू जि.वर्धा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांच्या अनुदान वाटपात अनियमितता झाल्याबाबत संबंधित प्राचार्यांना निलंबित करण्यात येत आहे.तसेच शासन भ्रष्टाचार करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही, असेही  श्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed