• Fri. Nov 15th, 2024

    नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो ‘महारोजगार मेळाव्या’चे आयोजन

    ByMH LIVE NEWS

    Dec 7, 2023
    नागपूर येथे ९ आणि १० डिसेंबरला नमो ‘महारोजगार मेळाव्या’चे आयोजन

    मुंबई,दि ७ : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन दिनांक ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ‘नमो महारोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजता, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

    ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महामेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मेळाव्यात विविध पदांसाठी ७०० नियुक्त्या होणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल ४० हजारांहून अधिक जागांसाठी पदभरती होणार आहे. या रोजगार महामेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

    नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नमो महारोजगार बटनवर क्लिक करून, विचारलेली माहिती संपूर्णपणे भरून नोंदणी पूर्ण करावी.

    मंत्री श्री.लोढा म्हणाले की, या महारोजगार मेळाव्यात स्टार्टअप्स, इन्क्युबेटर्स आणि इनवेस्टर्स तसेच नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विभागाच्या वेगवेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी स्टॉल्सही उभारण्यात येणार आहेत. स्टार्टअप्स उभारण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इनोव्हेटर्सच्या सगळ्या शंकांच निरसणही केले जाणार आहे.एकाच छताखाली इनोव्हेटर्स, इन्क्युबेटर्स आणि इनवेस्टर्स यांच्यासाठी हा मेळावा पर्वणी ठरणार आहे. उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, स्टार्टअप्ससाठी मार्गदर्शन, इन्व्हेस्टर्ससाठी गुंतवणुकीच्या संधी  या मेळाव्यात तयार होतील. यासाठी अधिकाधिक संख्येत स्टार्टअप्स, इनवेस्टर्स आणि इनकुबेटर्सनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.लोढा यांनी केले आहे.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

     

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed